दिग्रस येथील सहकारी संस्थांना अखेरची घरघर

By Admin | Updated: April 20, 2015 00:07 IST2015-04-20T00:07:07+5:302015-04-20T00:07:07+5:30

‘विनासहकार नही उद्धार’ या उक्तीप्रमाणे दिग्रस तालुक्यात काही वर्षांपूर्वी सहकारी संस्था भरभराटीस आल्या होत्या.

The last house to co-operatives in Digras | दिग्रस येथील सहकारी संस्थांना अखेरची घरघर

दिग्रस येथील सहकारी संस्थांना अखेरची घरघर

अनेक बेरोजगार : सहकार क्षेत्र झाले भ्रष्टाचाराचे कुरण
प्रकाश सातघरे  दिग्रस
‘विनासहकार नही उद्धार’ या उक्तीप्रमाणे दिग्रस तालुक्यात काही वर्षांपूर्वी सहकारी संस्था भरभराटीस आल्या होत्या. शेकडो हातांना काम मिळाले होते. परंतु काही दिवसातच या संस्था भ्रष्टाचाराचे कुरण ठरल्या. आज सहकारातील अनेक संस्थांना अखेरची घरघर लागली आहे. सहकारी संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे.
सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न पाहिले गेले. दिग्रस तालुक्यात अनेक सहाकरी संस्था तत्कालिन नेत्यांनी मोठ्या कष्ठाने उभ्या केल्या. जिल्ह्यातील नामवंत प्रथम क्रमांक असलेली खरेदी-विक्री संस्था अनेक शेतकऱ्यांच्या आशेचे स्थान झाली होती. त्यासोबतच जिनिंग, सहकारी बँका, सोसायट्याही भरभराटीस आल्या होत्या. शेतकरी आपल्या हक्काच्या संस्था म्हणून विकासासाठी धडपडत होते. परंतु काही महाभागांनी या सहकारी क्षेत्राला आपली खासगी मालमत्ता केली. शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खावून अनेकजण गब्बर झाले. शेतकरी मात्र आहे त्याच स्थितीत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपले खिसे कसे भरता येईल, यावरच सर्वांचा भर दिसतो आहे.
तालुक्यातील सहकारी संस्था व सहकारी उद्योगांना घरघर लागली आहे. खरेदी-विक्री संस्था आज भ्रष्टाचाराच्या खाईत गेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे, या विवंचनेत आहे. जिनिंग संस्था तीन वर्षांपासून बंद आहे. तिला लिजधारकांनीच कुलूप लावले आहे. आता जिनिंग फॅक्टरीच्या आवारातील गवत विकण्याशिवाय कोणतेच काम नाही. बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोपावर आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी कोणतीही योजना राबविली जात नाही. तालुक्याची संजीवनी म्हणून नावलौकिक जिनिंग संस्था अवसायनात काढण्यात आली आहे. सहकारी सोसायट्या व बँकेची अवस्था दयनीय झाली आहे. सहकाराला लागलेल्या ग्रहणाचा परिणाम तालुक्याच्या बाजारपेठेवर होत आहे.
कधी काळी कापसासाठी दिग्रसची बाजारपेठ प्रसिद्ध होती. दूरवरून व्यापारी कापूस खरेदीसाठी येत होते. सहकाराच्या माध्यमातून जिनिंग केले जात होते. परंतु आता या संस्थांना अवकळा आल्याने तेथील कामगारांनाही काम मिळत नाही. कामाच्या शोधात शेकडो मजूर परप्रांतात स्थलांतरित होत आहे. तर दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. यातून शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत असल्याचा आरोप होत आहे.

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
सहकारी संस्थेत शेतकरीच मालक असल्याने शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळत होता. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास आवाज उठविला जात होता. परंतु आता सहकारी संस्था मोडकळीस आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य खुल्या बाजारात विकावे लागते. यातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत आहे. कुणी आवाजही उठवायला तयार नसतो. रोख पैसे हवे असल्यास कट्टी कापली जाते. खेडा खरेदीत दांड मारण्याचे प्रमाणही वाढले आहे.

Web Title: The last house to co-operatives in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.