आरक्षणावर अखेरच्या दिवशी दीडशे आक्षेप
By Admin | Updated: February 5, 2015 23:15 IST2015-02-05T23:15:45+5:302015-02-05T23:15:45+5:30
लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतोच ग्रामीण भाग ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमुळे राजकीयदृष्ट्या तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील

आरक्षणावर अखेरच्या दिवशी दीडशे आक्षेप
५२० ग्रामपंचायती : पहिल्या टप्प्यातील ४६८ ग्रामपंचायतींचे वॉर्ड फॉर्मेशन पूर्ण
यवतमाळ : लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतोच ग्रामीण भाग ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमुळे राजकीयदृष्ट्या तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील ४६८ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत झाली असून दुसऱ्या टप्प्यातील ५२० ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीवर गुरुवार या अखेरच्या दिवसापर्यंत २५० आक्षेप घेण्यात आले.
ग्रामीण भागातील राजकीय घडामोडींनी खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील म्हणजे मार्च महिन्यात ४६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी वॉर्ड फॉर्मेशन आणि सदस्यांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच अशा गावात मतदारयादीचा कार्यक्रम लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील ५२० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जुलै ते डिसेंबर महिन्यात होवू घातल्या आहे. त्यासाठी आतापासूनच प्रत्येक गावात वॉर्ड फॉर्मेशनची प्रक्रिया राबविण्यात आली. तालुक्याच्या ठिकाणावरून महिला व पुरुषांच्या आरक्षणाची सोडतही झाली. या आरक्षणावर आक्षेप घेण्यासाठी प्रशासनाकडून गुरुवार ५ जानेवारीची मुदत देण्यात आली होती.
शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागात आक्षेप घेणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. शेवटच्या दिवशी तब्बल १०० जणांनी आरक्षणाच्या सोडतीवर आक्षेप नोंदविला होता. यापूर्वी १५० आक्षेप आले होते. शेवटच्या काही तासात आक्षेप घेणाऱ्यांची एकच झुंबड केल्याने कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली होती.
गावातील राजकीय समीकरण वॉर्ड आणि त्यातील महिला पुरुषांचे आरक्षण या भोवती गुरफटलेले असते. बऱ्याच ठिकाणी एका वॉर्डात सर्वच महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुरुषांनी अन्याय झाल्याच्या भावनेतून किमान एका वॉर्डात एक जागा मिळावी, अशा स्वरूपाचेही आक्षेप नोंदविले आहे. काही ठिकाणी लोकसंख्येच्या आधारानुसार जातीचे आरक्षण देण्यात आले नाही. अशा काही तांत्रिक स्वरूपाच्या चुका हेरून आक्षेप घेतले जात आहे. मात्र ज्या आक्षेपांमध्ये कायदेशीर तथ्य आहे अशाच आक्षेपांना ग्राह्य धरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एकंदर आता ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत गावपातळीवरच्या घडामोडींना वेग येणार आहे. आता सध्या गावपुढारी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारतानाच दिसतात. लवकरच हे चित्र पालटणार असून गावागावातील समीकरणाची जुळवाजुळव करण्यात ही पुढारी मंडळी व्यस्त होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)