नामांकनासाठी शेवटच्या दिवशी उसळली गर्दी

By Admin | Updated: October 30, 2016 00:09 IST2016-10-30T00:09:53+5:302016-10-30T00:09:53+5:30

नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता.

The last day of the nomination | नामांकनासाठी शेवटच्या दिवशी उसळली गर्दी

नामांकनासाठी शेवटच्या दिवशी उसळली गर्दी

नगरपरिषद लढत : आठ नगराध्यक्ष, २१४ जागांसाठी चुरस
यवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे आठही नगरपरिषद क्षेत्रात नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. निवडणूक आयोगाने एक तास वेळ वाढवून दिल्याने तसेच आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यात आल्याने अनेकांना दिलासा मिळाला. शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवकांच्या २१४ जागांसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले. आठ नगराध्यक्ष पदांसाठी १०२ अर्ज दाखल झाले आहेत. नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर आहे.
प्रारंभी दोन दिवस निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ जाम होते. यामुळे अनेक उमेदवारांना अर्ज दाखल करता आले नाही. यानंतर २६ आॅक्टोबरपासून नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. मात्र अनेक पक्षांचे उमेदवारच निश्चित न झाल्याने इच्छुकांना अर्ज दाखल करता आले नाही. पक्षाच्या उमेदवारीची त्यांना प्रतीक्षा होती. पक्षांनी ऐन शेवटच्या दिवशी उमेदवारी घोषित केल्याने शेवटच्या दिवशी सर्वाधिक नामांकन अर्ज दाखल झाले. शनिवारी पक्षाचा ए, बी फॉर्म मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्ष कार्यालयात एकच गर्दी केली होती. शेवटच्या क्षणी काही इच्छुकांना डावलण्यात आल्याने सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम‘ असे चित्र दिसत होते. पक्षाच्या ए.बी. फॉर्मसाठी उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत फिल्डींग लावली होती.
यवतमाळात भरली जत्रा
शेवटच्या दिवशी यवतमाळात भाजपातर्फे रेखा, शिवसेनेच्या कांचन बाळासाहेब चौधरी, राष्ट्रवादीच्या रचना राजेश पाटील यांच्यासह शबाना शेख शकील, सुनंदा विश्वास वालदे, मनीषा वसंत तिरणकर, किरण प्रकाश मेश्राम, वंदना सुधाकर घायवान, ज्योती गौतम खोब्रागडे, जरीना अब्दुल गफार मनियार, शामलता गौतम तायडे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमदेवारी अर्ज दाखल केले. (शहर वार्ताहर)

नगरपरिषदनिहाय दाखल उमेदवारी अर्ज
यवतमाळ नगरपरिषदेच्या ५६ जागांसाठी ४४१ अर्ज दाखल झाले, तर नगराध्यक्षपदासाठी १३ महिला उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले. वणी नगराध्यक्षपदासाठी १९ अर्ज दाखल झाले, तर नगरसेवकांसाठी दाखल झालेल्या अर्जाचे चित्र उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. पुसद नगरपरिषदेच्या २९ जागांसाठी २०२, तर नगराध्यक्ष पदासाठी ५ अर्ज दाखल झाले आहे. दिग्रस येथे २३ जागांसाठी १६२, तर नगराध्यक्षासाठी १६ अर्ज दाखल झाले. उमरखेड येथे २४ जागांसाठी १७५, तर नगराध्यक्ष पदासाठी १४ अर्ज सादर झाले. दारव्हा नगरपरिषदेच्या २० जागांसाठी १५३ तर नगराध्यक्ष पदासाठी १४ अर्ज आले आहे. आर्णी येथे १९ जागांसाठी १२७, तर नगराध्यक्ष पदासाठी ६ अर्ज दाखल झाले. घाटंजी नगरपरिषदेच्या १७ जागांसाठी १३५, तर नगराध्यक्ष पदासाठी १२ अर्ज आले आहेत.

Web Title: The last day of the nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.