४२ वर्षांपासून नंदपूर धरण अर्धवटच
By Admin | Updated: December 11, 2014 23:16 IST2014-12-11T23:16:13+5:302014-12-11T23:16:13+5:30
तालुक्यातील किन्ही-नंदपूर येथील धरणाचे बांधकाम गेल्या ४२ वर्षांपासून अर्धवट स्थितीत खितपत पडले आहे. सन १९७२-७३ पासून आत्तापर्यंत ९० टक्के बांधकाम झाले असून केवळ १० टक्के काम अपूर्ण आहे.

४२ वर्षांपासून नंदपूर धरण अर्धवटच
पांढरकवडा : तालुक्यातील किन्ही-नंदपूर येथील धरणाचे बांधकाम गेल्या ४२ वर्षांपासून अर्धवट स्थितीत खितपत पडले आहे. सन १९७२-७३ पासून आत्तापर्यंत ९० टक्के बांधकाम झाले असून केवळ १० टक्के काम अपूर्ण आहे.
सन १९७२-७३ मध्ये या धरणाच्या कामाला सुरूवात झाली. त्याला आता ४२ वर्षे लोटली. दरम्यानच्या काळात धरणाचे कसे तरी ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले. मात्र केवळ १० टक्के काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपत आहे. अर्धवट स्थितीतील हे धरण पूर्ण झाल्यास किन्ही-नंदपूर परिसरातील दुष्काळी भागाततील शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ होऊ शकतो. सिंचनाची सुविधा झाल्यास या परिसरातील शेतकरी नगदी बारमाही पिके घेऊ शकतील. त्यामुळे त्यांची आर्थिक बाजू सुधारू शकते.
सध्या या परिसरातील शेतकरी नापिकी व कर्जबाजारामुळे हैराण आहेत. त्यातून शेतकरी आत्महत्या घडत आहेत. हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण पूर्ण होण्याची गरज आहे. त्यातून सिंचनासोबतच व जंगली जनावारांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. मात्र हे धरण वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्यामुळे व वनहक्क कायद्यामुळे वन विभागाचा सतत अडथळा येत आहे.
या धरण क्षेत्रात रोजगार हमी योजनेअंतर्गत कोट्यवधींची कामे आवश्यकता नसताना झाली आहे. त्याऐवजी हे धरण पूर्ण झाले असते, तर शासनाचे कोट्यवधी रूपये वाचले असते. शेतकऱ्यांचा आर्थिक लाभही झाला असता. तथापि राज्य सरकारने या धरणाकडे आजपर्यंत दुलर्क्ष केले आहे.
आता शेतकऱ्यांनी धरणाचे बांधकाम करून शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ द्यावा, अशी मागणी पुढे रेटली आहे. धरण पूर्ण न केल्यास परिसरातील शेतकरी आत्मदहन करतील, असा इशारा किन्ही, घोडदरा, किन्हाळा येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
येत्या अधिवेशन काळात मागणीचा विचार न झाल्यास त्यांनी आत्मदहनाचा मार्ग स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार, आमदारांनाही निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना किसन आदे, श्रीहरी कट्टेवार, अभय कट्टेवार, भास्कर आदे, अशोक सामृतवार, वामन आदे, प्रमोद गोर्लेवार, राकेश नेमनवार, चंद्रशेखर पोलाडीवार, विजय तेलंगे यांच्यासह किन्ही, किन्हाळा, घोडदरा येथील अनेक शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)