पुसद दरोड्याचे तार पेट्रोलपंपावर एलसीबीचा तपास : आरोपी लोकलच
By Admin | Updated: June 20, 2015 00:08 IST2015-06-20T00:08:56+5:302015-06-20T00:08:56+5:30
पुसदमधील शासकीय कंंत्राटदाराकडे पडलेल्या १० लाख रुपयांच्या सशस्त्र दरोड्याचे तार काळीदौलत येथील पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याशी जुळत असल्याची माहिती आहे.

पुसद दरोड्याचे तार पेट्रोलपंपावर एलसीबीचा तपास : आरोपी लोकलच
यवतमाळ : पुसदमधील शासकीय कंंत्राटदाराकडे पडलेल्या १० लाख रुपयांच्या सशस्त्र दरोड्याचे तार काळीदौलत येथील पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याशी जुळत असल्याची माहिती आहे.
पुसद येथील रामनगरमध्ये राहणारे कंत्राटदार जयंत चिद्दरवार यांच्या घरी सुमारे १० लाखांचा सशस्त्र दरोडा पडला होता. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून आणि घरातील सदस्यांना डांबून ठेऊन ऐवज लुटून नेण्यात आला होता. पुसद शहर पोलीस गुन्ह्याचा तपास करीत आहे. मात्र अद्याप त्यांना त्याची दिशा निश्चित करता आलेली नाही. सुमारे दोन आठवडे लोटूनही पुसद पोलिसांना दरोडेखोरांंचा क्लू मिळू शकला नाही. ते हवेतच हात मारत असल्याचे पाहून अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे या दरोड्याचा समांतर तपास सोपविला. पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्या नेतृत्वात एलसीबीने या दरोड्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. चिद्दरवार यांच्याकडे पडलेल्या दरोड्याचे तार पुसद ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील काळीदौलत येथे ९ मे रोजी पहाटे ३.३० वाजता शाम प्रतापवार यांच्या प्रभूसाई पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याशी जुळत आहे. तेथून १४ हजार रुपये रोख लुटण्यात आले होते. हे दरोडेखोर क्रुझर गाडीतून आले होते.
संख्येने पाच ते सहा जण होते. पेट्रोल पंप व चिद्दरवार यांच्याकडे पडलेल्या दरोड्यातील कृती मिळती जुळती आहे.
शिवाय या दोनही घटनातील दरोडेखोर हे लोकलच असावे अशा निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत. या दरोड्यातील आरोपी एलसीबीच्या नजरेच्या टप्प्यात असून लवकरच ते गजाआड दिसतील असे दाव्याने एलसीबीच्या वर्तुळातून सांगितले जात आहे. हा दरोडा डिटेक्ट करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
क्राईम ब्रँच लागली कामाला
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी डिटेक्शनच्या मुद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या अर्धाडझन अधिकारी व दोन डझनावर पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला होता. प्रत्येकाची ओळख परेड करून घेऊन त्यांना दारू-जुगारावर धाडी घालणे तुमचे काम नाही, अशा शब्दात समज दिली गेली होती. त्यामुळे गुरुवारपासूनच एलसीबीची यंत्रणा अवैध धंद्यांचा मार्ग सोडून तपासाच्या कामी लागली आहे. सर्व प्रथम त्यांनी पुसदच्या दरोड्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या शाखेकडे सुमारे पाऊणशे गुन्ह्यांचे तपास आहेत. त्यात काही खुनाच्या गुन्ह्यांचाही तपास आहे.