राळेगावातील घाटांवर तस्करांच्या उड्या
By Admin | Updated: May 20, 2015 00:14 IST2015-05-20T00:14:19+5:302015-05-20T00:14:19+5:30
तालुक्यात एकूण १५ रेतीघाट आहेत. त्यापैकी केवळ चार रेती घाटांचे लिलाव झाले आहेत.

राळेगावातील घाटांवर तस्करांच्या उड्या
केवळ चार रेतीघाटांचे लिलाव : तालुका महसूल विभागाची कारवाई अपवादालाही नाही
राळेगाव : तालुक्यात एकूण १५ रेतीघाट आहेत. त्यापैकी केवळ चार रेती घाटांचे लिलाव झाले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ रेती घाटांवरून रेती चोरण्याकरिता रेतीचोरट्यांच्या उड्या पडत आहे.
गेली दोन आठवड्यात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी रेती घाटांवर धाडी टाकून मोठी कारवाई केली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात रेती चोरटे आणि गौण खनिज चोरट्यांमध्ये चांगलीच धडकी भरली होती. महिवाल यांची पुढील कारवाई राळेगाव तालुक्यात होईल, असा अंदाज बांधून सर्व संबंधितांनी आपल्या हालचाली थांबविल्या होत्या. आता जिल्हाधिकारी महिवाल यांची बदली झाल्याने रेती चोरटे बिनधास्त झाले असून सुखावले आहेत. आपल्या कारवाया पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत ते लागले आहेत.
दरम्यान, महसूल यंत्रणेने अद्यापही एकदाही याप्रकरणी कोठेही कडक कारवाई केली नसल्याने वेगवेगळी टीका होवू लागली आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर संशय घेतला जात आहे. तो दृढ होण्यापूर्वीच काहीतरी ठोस कारवाई दाखविण्याचे आव्हान महसूल विभागापुढे आहे.
रेती घाटातून अवैध उत्खनन होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. यानंतरही गावपातळीवरील तसेच तालुका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी रेतीच्या चोरीकडे दुर्लक्ष करत आहेत. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)