भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण
By Admin | Updated: March 31, 2016 03:01 IST2016-03-31T03:01:50+5:302016-03-31T03:01:50+5:30
येथील भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. या कार्यालयात नागरिकांची कुठलीही कामे ‘चिरीमिरी’ दिल्याशिवाय होत नाही.

भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण
पांढरकवडा : येथील भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. या कार्यालयात नागरिकांची कुठलीही कामे ‘चिरीमिरी’ दिल्याशिवाय होत नाही. याचाच लाभ दलाल घेत असल्याने नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. या प्रकाराला पायबंद घालावा, अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे.
या कार्यालयात कुठलेही काम तातडीने केले जात नाही. तत्काळ होऊ शकणाऱ्या कामासाठी दोन ते तीन महिने चकरा माराव्या लागतात. ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या मोजणीसंदर्भात या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू केला आहे. शेतजमीन मोजणीचा अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत जमिनीची मोजणी करावी लागते. यासाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येते. मात्र नियमानुसार शुल्क भरूनही अधिक रकमेची मागणी केली जाते, अशी ओरड सुरू आहे. रक्कम न भरल्यास ‘तारीख पे तारीख’, असा प्रवास करावा लागतो.
शहरी भागातील नगरिकांना गृह बांधणी किंवा इतर कामासाठी बँंकेचे कर्ज घ्यावे लागते. यासाठी मालमत्तेवर बोजा नोंदवावा लागतो. यापूर्वी ही प्रक्रिया तलाठ्यांमार्फत होत होती. मात्र आता भूमिअभिलेख कार्यालयाकडे ही प्रक्रिया वर्ग करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आलेला हा बदल आता डोकेदुखी ठरत आहे. तलाठ्यांमार्फत बोजा चढविण्याची कारवाई शक्य तितक्या लवकर व्हायची. परंतु भूमिलेख कार्यालयात मात्र आता वारंवार चकरा माराव्या लागत आहे.
भूमिअभिलेख कार्यालयात कुठलेही काम दलालामार्फत केल्यास तत्काळ होते, असा अनेक नागरिकांचा अनुभव आहे. या कार्यालयात आलेल्या नागरिकांना कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परत पाठविल्यानंतर त्यांना दलाल गाठतात. आपले काम तत्काळ करून दिले जाईल, असे सांगून जादा रकमेची मागणी करतात. त्यांची मागणी पूर्ण केल्यास कामही तत्काळ होते. नागरिकही येण्या-जाण्याचा खर्च आणि वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून याला बळी पडतात. जे काम दलालामार्फत होते, तेच काम थेट का केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)