दिग्रसच्या भूमिअभिलेखचा कारभार चालतो आर्णीवरून
By Admin | Updated: July 14, 2016 02:34 IST2016-07-14T02:34:53+5:302016-07-14T02:34:53+5:30
येथील तहसील परिसरातील भूमिअभिलेख कार्यालय गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभारावर असून सर्व कारभार आर्णीवरून चालविला जातो.

दिग्रसच्या भूमिअभिलेखचा कारभार चालतो आर्णीवरून
अधीक्षकांचा कक्ष कुलूपबंद : कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप
दिग्रस : येथील तहसील परिसरातील भूमिअभिलेख कार्यालय गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभारावर असून सर्व कारभार आर्णीवरून चालविला जातो. अधीक्षकांच्या कक्षाला तर कायम कुलूप लागलेले असते. यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक प्रकरणेही प्रलंबित आहे.
महसूल यंत्रणेमध्ये शासन आणि जनतेच्या मालमत्तेची नोंद ठेवणारे कार्यालय म्हणजे भूमिअभिलेख विभाग होय. येथील भूमिअभिलेख उपअधीक्षकांची ४ जून रोजी बदली झाली. त्यानंतर आर्णी येथील बी.व्ही. मस्के यांच्याकडे प्रभार देण्यात आला. त्यामुळे मस्के हे आपल्या सोयीने दिग्रस येथे येतात. योग्य त्याच नोंद घेतात. फेरफारसंबंधी फाईलवर सह्या करतात. ५ जुलै रोजी काही वेळासाठी मस्के येथे आले. आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना पुढील दिवशीपर्यंत नोंदणीसंबंधी कार्यवाही तयार ठेवावी, असे मौखिक आदेश देवून गेले.
सदर कार्यालयात २२ पदे असून चार पदे रिक्त आहे. काही कर्मचाऱ्यांकडे दोन-दोन टेबलचे काम आहे. १८ कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी येथे उपस्थित असतात. अधीक्षकच नसल्याने कर्मचारीही बिनधास्त झाले आहे. महसूल राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही स्थिती असून यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. प्रभारी भूमिअभिलेख अधीक्षकांची दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, १ ते ७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताहाचे काम होते. मंगळवारी यवतमाळ येथे जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या बैठकीला आणि बुधवारी अमरावती येथे बैठकीला हजर असल्याने आपण येऊ शकलो नाही. १ ते ७ जुलै दरम्यान कोणकोणती कामे केली, अशी विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कामे केली व त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला, असे उत्तर दिले. (प्रतिनिधी)