‘एटीएम’मधून ३५ हजार केले लंपास
By Admin | Updated: December 19, 2015 02:28 IST2015-12-19T02:28:04+5:302015-12-19T02:28:04+5:30
एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेलेल्या एकास दोन युवकांनी पैसे काढण्याकरिता मदत करण्याचा प्रयन्त केला.

‘एटीएम’मधून ३५ हजार केले लंपास
दोन भामटे : कार्डची केली क्षणात अदलाबदल, वृद्धाला लावला चुना
पांढरकवडा : एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेलेल्या एकास दोन युवकांनी पैसे काढण्याकरिता मदत करण्याचा प्रयन्त केला. काही क्षणातच त्याच्या हातात एटीएमचे बनावट कार्ड हातात देऊन मूळ एटीएम कार्ड घेऊन ३५ हजार रूप्ये लंपास केले. ही घटना सोमवारी घडली.
येथील शिवाजी वार्डातील देविदास वानखडे शहरातील बसस्थानकाजवळील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेले. एटीएमच्या रूममध्ये आधीच २0 ते २५ वर्षांचे दोन युवक होते. त्यांनी हिन्दीत देविदास यांना ‘आव अंकल, पहिले तुम पैसे निकालो’, असे म्हटले. देविदास यांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे निघत नव्हते. त्यामुळे एका युवकाने ‘लाव अंकल, मै पैसे निकाल के देता हू’, म्हणून त्यांनी कार्ड घेउन स्वाइप केले. देविदास यांना पासवर्ड मारायला सांगीतले. त्यानंतर देविदासने पासवर्ड मारून पाच हजार रूपये काढले. ते पैसे मोजत असताना त्या दोन युवकांनी एटीएम कार्ड देविदास यांच्या हाती दिले. त्यानी ते न बघता खिशात ठेवले व निघून गेले.
काही वेळेनंतर त्यांच्या मोबाईलवर दहा हजार रूपये काढल्याचा संदेश आला. त्यांनी लगेच बँकेत जाऊन चौकशी केली. मात्र संदेश चुकीने आला असेल, असे उत्तर मिळाल्याने ते परत गेले. रात्री अचानक पुन्हा ३५ हजार रूपये काढल्याचा संदेश त्यांना आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी बँकेत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याजवळील कार्ड हे दुसऱ्याचेच असल्याचे व ते ब्लॉक झाल्याचे आढळून आले.
ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठून त्या अज्ञात युवकांविरूद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी त्या अज्ञात दोन भामट्यांविरूद्ध भादंवि ४२०, तसेच आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (शहर प्रतिनिधी)