दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या
By Admin | Updated: October 21, 2014 22:58 IST2014-10-21T22:58:38+5:302014-10-21T22:58:38+5:30
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडत आहे. गत दोन दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ हाऊसफुल्ल असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या
यवतमाळ : दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडत आहे. गत दोन दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ हाऊसफुल्ल असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. या गर्दीत कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असली तरी उधार उसणवार करून शेतकरीही खरेदी करताना दिसत आहे.
दिवाळी अवघ्या एक दिवसावर आली आहे. प्रत्येकजण उत्साहात दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. हात सैल सोडून प्रत्येकजण दिवाळीच्या खरेदीत व्यस्त आहे. यवतमाळच्या कपडा बाजारात तर तुफान गर्दी झाली आहे. इंदिरा गांधी मार्केट, मेनलाईनमध्ये शहरातील ग्राहकांची तर नेताजी मार्केटमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण कपडे खरेदी करताना दिसत आहे. सर्वांचा कल रेडिमेड कपड्यांकडे असून त्यातही शहरी ग्राहक ब्रॅन्डेड कपड्यांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. कपड्यासोबतच आकाश दिवे, पणत्या, रांगोळी, घराचे सजावटी साहित्य घेताना गृहिणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रत्येक दुकानात सध्या पाय ठेवायलाही जागा नाही. सकाळी ९ वाजता उघडलेले दुकान रात्री उशिरापर्यंत सुरू असते. फटाके खरेदीसाठी बच्चेकंपनी आतूर असून आपल्या पालकांना घेऊन आझाद मैदान गाठत आहे. तर अनेक पालक शहरातील फटाका दुकानातून फटाके खरेदी करताना दिसत आहे.
कर्मचाऱ्यांचे झालेले पगार आणि मिळालेल्या बोनसमुळे खरेदीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या गर्दीत मात्र शेतकरी हात राखून खरेदी करताना दिसत आहे. नाईलाजाने उधार उसणवार करून मुलाबाळांसाठी कपडे खरेदी करावे लागत आहे. सोयाबीन, कपाशीने दिलेल्या दग्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. मात्र बाजारपेठेतील ग्राहकांचा दिसत असलेला उत्साह आनंद द्विगुणित करणारा आहे. (नगर प्रतिनिधी)