नेर येथे नवीन वसाहतीत नागरी सुविधांचा अभाव
By Admin | Updated: March 26, 2015 02:09 IST2015-03-26T02:09:54+5:302015-03-26T02:09:54+5:30
येथे झालेल्या नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. रस्ते, लाईट, पाणी, सांडपाण्याच्या नाल्या आदी समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

नेर येथे नवीन वसाहतीत नागरी सुविधांचा अभाव
नेर : येथे झालेल्या नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. रस्ते, लाईट, पाणी, सांडपाण्याच्या नाल्या आदी समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. प्लॉट पाडतांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ले-आऊट मालकांनी केली नसल्याने आता नगरपरिषदेवर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक भार पडत आहे. परिणामी इतर विकास कामांना खीळ बसला आहे.
आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना प्लॉट खरेदीसाठी आकृष्ट केले जाते. उद्यान, पथदिवे, डांबरी रस्ते, पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या माध्यमातून दिले जाते. प्रत्यक्ष प्लॉट खरेदीनंतर यातील कुठल्याही सुविधा नागरिकांना उपलब्ध होत नाही. पथदिवे कुठेच दिसत नसल्याने अंधाराचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने घरातून निघणाऱ्या पाण्याचे गटारं जागोजागी तयार झालेले दिसतात. या प्रकाराचा डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होतो.
डांबरी रस्त्याचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडते. लाल मुरमावर डांबरीकरण केले जाते. साधारण वाहतुकीनेही रस्ता उखडतो. कालांतराने संपूर्ण रस्त्याला खडीकरणाचे स्वरूप येते. परिणामी लोकांना अशाच रस्त्यावरून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाममात्र केलेली असते. एखादी विहीर खोदून त्याद्वारे पाणी पुरविले जाते. उन्हाळ्यात नागरिकांना दिवसरात्र पाण्यासाठी भटकावे लागते.
सर्व नवीन वसाहती नगरपरिषद क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक आपले प्रश्न घेऊन पालिकेकडे जातात. अशावेळी पालिकेने या समस्या सोडवाव्या अशी अपेक्षा ठेवली जाते. पालिकेकडून या सुविधांची पूर्तता करण्यात येते. मात्र हा अतिरिक्त बोजा ठरतो. त्यामुळे प्लॉट मालकानेच सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय प्लॉट विक्रीसाठी परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी होत आहे. महसूल विभागानेही यासाठी संबंधित ले-आऊट मालकांना सक्ती करावी आणि प्रसंगी कठोर कारवाईसुद्धा केली जावी, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)