उमरखेडच्या पोलीस वसाहतीत सुविधांचा अभाव

By Admin | Updated: May 6, 2015 01:55 IST2015-05-06T01:55:19+5:302015-05-06T01:55:19+5:30

तालुक्यातील ४२ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या उमरखेड ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय निवासस्थानात जीव मुठीत घेऊनच रहावे लागते.

Lack of facilities in Ummarkhed police colony | उमरखेडच्या पोलीस वसाहतीत सुविधांचा अभाव

उमरखेडच्या पोलीस वसाहतीत सुविधांचा अभाव

उमरखेड : तालुक्यातील ४२ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या उमरखेड ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय निवासस्थानात जीव मुठीत घेऊनच रहावे लागते. ब्रिटीशकालीन निवासस्थानांची पडझड झाली असून इमारतीही जीर्ण आहे. दारे खिडक्या तुटल्या असून अशा विपरित परिस्थितीतही पोलीस या ठिकाणी राहत आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या उमरखेड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ४२ गावांसह उमरखेड शहर समाविष्ठ आहे. जवळपास दीड लाख लोकसंख्येची सुरक्षा करण्याची जबाबदारी येथील कर्मचाऱ्यावर आहे. अपुरे मनुष्यबळ आणि निवासस्थानांची दूरवस्था अशा स्थितीत तालुक्याच्या सुरक्षेसाठी पोलीस मात्र डोळ्यात तेल घालून असतात. उमरखेड येथील पोलीस ठाणे ब्रिटीशकालीन आहे. त्यावेळी बांधलेल्या इमारतीतच पोलीस ठाणे आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे निवासस्थानही आहे. या निवासस्थानाची देखभाल दुरुस्ती योग्य होत नसल्याने त्याच्यावर अवकळा आली आहे. अनेक निवासस्थानांचे छप्पर तुटले असून पावसाळ्यात पाणी गळते. दारे, खिडक्याही तुटलेल्या आहेत. या परिसरात नेहमी घाणीचे साम्राज्य असते. वारंवार दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला पत्र देऊनही दुरुस्तीचे नाव मात्र घेतले जात नाही. या ठिकाणी पोलीस आपल्या परिवारासह राहतात. संपूर्ण जनतेची सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांच्या मनात मात्र निवासस्थानामुळे कायम भीती असते. जोरदार वादळ अथवा नैसर्गिक आपत्ती आली तर काय होईल, अशी भीती असते. जुन्या काळात बांधलेल्या या निवासस्थांमध्ये शौचालयाचीही दुरवस्था आहे. वरिष्ठांनी निवासस्थानाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lack of facilities in Ummarkhed police colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.