आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

By Admin | Updated: February 12, 2015 01:54 IST2015-02-12T01:54:27+5:302015-02-12T01:54:27+5:30

आरोग्य व स्वच्छतेच्या मूलमंत्रांचे धडे देण्यासाठी विविध योजनेतून शासनाच्या ग्रामीण भागात लाखो रूपयांचा खर्च होत असला तरी काळी (दौ)

Lack of facilities in health center | आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

मोहदी : आरोग्य व स्वच्छतेच्या मूलमंत्रांचे धडे देण्यासाठी विविध योजनेतून शासनाच्या ग्रामीण भागात लाखो रूपयांचा खर्च होत असला तरी काळी (दौ) आरोग्य केंद्रात मात्र सुविधांचा अभाव दिसत आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना व विविध आजारांमुळे दाखल झालेल्या रुग्णांना या आरोग्य केंद्रात मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत माळवाकद, काळी(दौ), साई, बोरी, वडद, माळेगाव, कान्हा हे सात उपकेंद्र येतात. काळी(दौ) या आरोग्य केंद्रात ३२ गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. दररोज १०० पेक्षा अधिक बाह्य रुग्णांची नोंद केली जाते. परंतु आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रुग्णांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध सात पदे रिक्त आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्री आरोग्य सहायकांचे दोन पदे, आरोग्य सेवक दोन तसेच परिचर, सफाई कामगार आदी पदांचा समावेश आहे. दर आठवड्याला २० ते २५ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया याठिकाणी केल्या जातात. परंतु आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाही. प्रसाधनगृह आहे पण ते बंद अवस्थेत आहे. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते. आरोग्य केंद्राला घाणीचा विळखा असल्याचे दिसून येते. रात्रीच्या सुमारास तर याठिकाणी डॉक्टर असणे दुरापास्त झाले आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांचे नातेवाईकही रुग्ण बनतात. आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांना जेवणाची व्यवस्था नसल्याने नातेवाईकांना घाणीच्या परिसरातच उघड्यावर स्वयंपाक करावा लागतो. अपुऱ्या खाटांमुळे शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपावे लागते. गाद्यांवर बेडशीटसुद्धा नाही. रुग्णांसोबतच्या नातेवाईकांचे हाल तर याहीपेक्षा बेकार असतात. त्यांना व्हरांड्यातील फरशीवर रात्र काढावी लागते. जिल्हा आरोग्य विभागाचे मात्र सर्व काही माहीत असताना याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)

Web Title: Lack of facilities in health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.