राळेगाव बसस्थानकावर सोयी-सुविधांचा अभाव
By Admin | Updated: May 15, 2015 02:19 IST2015-05-15T02:19:39+5:302015-05-15T02:19:39+5:30
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या राळेगाव येथील एसटी बसस्थानकावर सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.

राळेगाव बसस्थानकावर सोयी-सुविधांचा अभाव
राळेगाव : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या राळेगाव येथील एसटी बसस्थानकावर सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. परंतु याठिकाणी कोणत्याही आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्या, लग्नसराई आदी कारणांमुळे बसस्थानकावरची गर्दी प्रचंड वाढली आहे. परंतु याठिकाणी प्रवाशांसाठी कुठल्याही आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. सध्या प्रचंड उकाड्याच्या दिवसांमध्येही बसस्थानकावरील पंखे बंद आहेत. प्रवाशांना बसची वाट पाहात बसण्यासाठी पुरेसे आसनसुद्धा येथे उपलब्ध नाही. प्रसाधनगृह अतिशय जुने असून मोडकळीस आले आहे. महिला व पुरुष प्रसाधनगृहामध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्यामुळे व अपुरी जागा असल्याने अनेकजण उघड्यावरच लघुशंकेला जातात. त्यामुळे या परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही येथे योग्य व्यवस्था नाही. पाण्यासाठी असलेली टाकी अतिशय जुन्या पद्धतीची असून कधीही स्वच्छ केली जात नाही. या टाकीसभोवताल प्रचंड घाण आहे. यासंदर्भात आगार व्यवस्थापक पांडे यांना विचारणा केली असता सर्व सोयीसुविधांबाबत आपण यवतमाळ विभागीय कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार केला असून वरिष्ठांना वेळोवेळी माहिती दिली आहे. परंतु वरिष्ठांकडून दखलच घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)