शासकीय रुग्णालयात यंत्रांची कमतरता

By Admin | Updated: November 18, 2014 23:04 IST2014-11-18T23:04:55+5:302014-11-18T23:04:55+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील हजारो रुग्ण दररोज येत असतात. परंतु येथे आवश्यक त्या सोयी सुविधा नसल्यामुळे

Lack of equipment in government hospital | शासकीय रुग्णालयात यंत्रांची कमतरता

शासकीय रुग्णालयात यंत्रांची कमतरता

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील हजारो रुग्ण दररोज येत असतात. परंतु येथे आवश्यक त्या सोयी सुविधा नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मधुमेह रुग्णांची संख्या असून शासकीय रुग्णालयात मात्र डायलिसीस सेंटरची सोय उपलब्ध नाही. ती त्वरित उपलब्ध करावी, अशा सूचना खासदार भावना गवळी यांनी दिल्या.
खासदार भावना गवळी यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आकस्मिक भेट दिली. यावेळी येथील भोंगळपणा तसेच रुग्णांची होत असलेली गैरसोय त्यांच्या निदर्शनास आली. जिल्ह्यात मधुमेह रुग्णांची मोठी संख्या असतानाही येथे मात्र डायलिसीस सेंटर व इतर कोणतेही आवश्यक उपचार उपलब्ध नाही. हे सेंटर सुरू करावे, या बाबत तीन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे गवळी यांनी पाठपुरावा केला होता. या मागणीची अंशत: दखल घेऊन शासनाने डायलिसीसचे केवळ एकच यंत्र उपलब्ध करून दिल्याचे खासदारांच्या निदर्शनास आले. केवळ दोन यंत्राचांची येथे आवश्यकता असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन चालविणाऱ्या तंत्रज्ञाची गरज आहे. सोनोग्राफीसाठी मोठी रांग लागलेली असते. या ठिकाणी आवश्यक त्या मशीन व तंत्रज्ञाची कमतरता आहे. लोकांची गर्दी लक्षात घेता ही व्यवस्था वाढविण्याची तीव्र गरज आहे. एक्स-रे काढण्यासाठी तंत्रज्ञच नाही. लेझर मशीन नादुरुस्त असल्याचेही यावेळी खासदारांच्या निदर्शनास आले. प्रशासकीय इमारतीचे काम शेवटच्या टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करून सदर इमारत त्वरित महाविद्यालयाच्या ताब्यात द्यावी अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता होतवाणी यांना भ्रमणध्वनीवरून खासदार गवळी यांनी या इमारतीला पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन देण्याची प्राधिकरणाला सूचना देण्यात आल्या. रुग्णालयाला दिलेल्या भेटीत त्यांच्या निदर्शनास आलेल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी या संदर्भात मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांची आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला सांगितले. जिल्ह्यातील रुग्णांना योग्य व वेळेवर सेवा मिळावी, यासाठी सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे खासदार गवळी म्हणाले. यावेळी संतोष ढवळे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Lack of equipment in government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.