कोची प्रकल्पाचे काम रखडले
By Admin | Updated: April 10, 2015 00:12 IST2015-04-10T00:12:28+5:302015-04-10T00:12:28+5:30
घाटंजी तालुक्यातील कोची तलाव प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पातील प्रस्तावित सिंचन सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

कोची प्रकल्पाचे काम रखडले
सुदाम दारव्हणकर रूंझा
घाटंजी तालुक्यातील कोची तलाव प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पातील प्रस्तावित सिंचन सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
कोची तलावाच्या कामांना २००८ मध्ये सुरूवात करण्यात आली. हा प्रकल्प २०११ मध्ये पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र २०१० मध्ये या तलावाचे काम बंद पडले. त्यानंतर हा प्रकल्प अजूनही रखडलेला आहे. दोन वर्षाच्या कालावधीत फक्त धरणाच्या बांधाची मातीकाम आणि पुच्छ कालवा तयार झाला आहे. धरणाची तोंडी, वेस्टवेअर, कालवा हे काम होणे बाकी आहे.
या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून १६५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ७० हजार रुपये एकराप्रमाणे मोबदला देण्यात आला. या प्रकल्पाचे पाणी कोची, शिवणी, जरंग, जरूड, वृंदावन टाकळी या गावातील ९१५ हेक्टरमध्ये पोहोचणार आहे. प्रकल्पाचे कंत्राट पुणे येथे जगदाणी कंपनीने घेतले. या प्रकल्पावर १७ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्याबदल्यात एक थेंब पाणीसुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शाश्वत शेती करण्यासाठी सिंचनाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. मात्र कोची प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी शासनाच्या उदासिन धोरणामुळे दुर्दैवी ठरत आहे. सिंचन प्रकल्पाचे काम कधीच वेळेत पूर्ण केले जात नाही. लाभक्षेत्रासोबतच बुडीत क्षेत्रातीलही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची मालिकाच सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. लहान-मोठ्या सर्वच प्रकल्पांबाबत अतिशय दुर्लक्षीत धोरण राबविले जात असल्याने यात अधिकारी, कंत्राटदार गब्बर होत आहे.