नागपूरच्या टोळीकडून देशी कट्ट्यासह चाकू जप्त
By Admin | Updated: February 19, 2015 00:07 IST2015-02-19T00:07:30+5:302015-02-19T00:07:30+5:30
नागपूर येथून तीन आलिशान वाहनांद्वारे देशी कट्ट्यासह घातक शस्त्र असलेली सुमारे २० जणांची गुन्हेगारी टोळी यवतमाळात आली.

नागपूरच्या टोळीकडून देशी कट्ट्यासह चाकू जप्त
यवतमाळ : नागपूर येथून तीन आलिशान वाहनांद्वारे देशी कट्ट्यासह घातक शस्त्र असलेली सुमारे २० जणांची गुन्हेगारी टोळी यवतमाळात आली. याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने त्यांचा येथील धामणगाव मार्गावरील पॉलिटेक्निक कॉलेजपासून सिनेस्टाईल पाठलाग केला. यावेळी बालाजी चौकात एक वाहन पोलिसांच्या हाती लागले. त्यातून चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहनासह त्यांची झडती घेतली असता एक देशी कट्टा, दोन जिवंत काडतूस, धारदार दोन चाकू, एक फोल्डींगचा चाकू आढळून आला. पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली. तसेच वाहनासह घातक शस्त्रांचा साठा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
भूषण रमेश चरडे (२४) रा. कोंढाळी बाजार नागपूर, दिलीप कृष्णाजी ठवकर (२९) रा.जुनी शुक्रवारी नागपूर, रॉबीन स्टिव्हन जोसेफ (२४), दुर्गेश अंबादास महल्ले (२८) दोघेही रा.झिंगाबाई टाकळी वॉर्ड नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तीन वाहनातून नागपूर येथून गुन्हेगारांची १५ ते २० जण असलेली टोळी यवतमाळात एका गुन्हेगारी घटनेला मूर्त रूप देण्यासाठी आली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कर्मचारी गजानन डोंगरे आणि हरिश राऊत यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांना दिली. त्यावरून येथील धामणगाव मार्गावर सापळा रचण्यात आला. मात्र पथकाला हुलकावणी देवून तीनही वाहने भरधाव निघाली. यावेळी सिनेस्टाईल पाठलाग करून येथील बालाजी चौकात कार (एम.एच.३१/सीएस-२७६१) ला अडविण्यात आले. त्यानंतर कारमधील संबंधित चौघांना पथकाने ताब्यात घेतले. तोवर म्होरक्यासह त्यांचे साथीदार दोन वाहनांमधून नागपूरकडे पसार झाले. पथकाने ताब्यातील संबंधित चौघे आणि कारची झडती घेतली. त्यामध्ये देशी कट्ट्यासह घातक शस्त्रांचा साठा आढळून आला. पोलिसांनी कार, चार मोबाईल, घातक शस्त्र जप्त करून संबंधित चौघोविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र आरोपींनी आपला मित्र स्वप्नील तलमले याचा अपघात झाला असून त्याला पाहण्यासाठी येथे आल्याचे पोलिसांपुढे उघड केले. स्वप्नील हा स्थानिक गुन्हेगार असून त्याच्या शिरावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याची नागपुरात फार मोठी ओळख नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी सदस्यांची टोळी त्याला बघण्यासाठी येईल, याबद्दल संशय व्यक्त होत आहे. कारवाई फौजदार आर.डी. वटाने, सुगत पुंडगे, जमादार विजय डबले, गजानन डोंगरे, हरिश राऊत, विशाल भगत, संजय दुबे, सचिन हुमने, आशीष चौबे, योगेश डगवार आदींनी सहभाग घेतला होता. (स्थानिक प्रतिनिधी)