आमदारांच्या घरावर किसान क्रांती मोर्चा
By Admin | Updated: June 9, 2017 01:49 IST2017-06-09T01:49:06+5:302017-06-09T01:49:06+5:30
शेतकऱ्यांकडील कर्ज सरसकट माफ करावे व स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासाठी राज्यभर १ जुनपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

आमदारांच्या घरावर किसान क्रांती मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शेतकऱ्यांकडील कर्ज सरसकट माफ करावे व स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासाठी राज्यभर १ जुनपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या घरावर मोर्चा काढून या आंदोलनाचा शेवट करण्यात आला.
राज्य सरकारने केवळ अल्पभूधारकाकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विदर्भातील शेतकऱ्यांना मान्य नसल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात आले. बुधवारी विविध पक्षाच्या वतीने टिळक चौकातून किसन क्रांती मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, बहुजन महासंघ या पक्षाने सहभाग घेतला होता. आमदार बोदकुरवार यांच्या घरी मोर्चा पोहोचताच आमदार बोदकुरवार निवेदन स्विकारण्यासाठी घराबाहेर आले. आंदोलनकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर आंदोलकांना आमदारांच्या कार्यालयाला लावलेल्या कुलूपावर मागण्यांचे पत्रक चिपकविले व आंदोलनाची सांगता केली. आंदोलनाचे नेतृत्व कॉ.दिलीप परचाके, देवराव धांडे, दिलीप भोयर, दशरथ बोबडे यांनी केले. यावेळी बौद्ध महासभेचे मिलींद पाटील, भारिप बमसंचे मंगल तेलंग, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, बालाजी काकडे, दत्ता डोहे यांची उपस्थिती होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी आमदारांच्या निवासस्थानासमोर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बुधवारी झालेल्या मोर्चात मात्र शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकही कार्यकर्ता समाविष्ठ नसल्याने याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती.