७६ हजार हेक्टरवर होणार खरिपाची लागवड
By Admin | Updated: May 30, 2017 01:21 IST2017-05-30T01:21:47+5:302017-05-30T01:21:47+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा तडाखा सहन करीत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत.

७६ हजार हेक्टरवर होणार खरिपाची लागवड
पुसद तालुका : पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णत्वाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा तडाखा सहन करीत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत. त्यानंतर शेतकरी खत व बियाणे जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाची.
तालुक्यात खरीपाचे ७६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काढणी केली. त्यानंतर काही दिवस उसंत घेऊन बैलजोडी ज्यांच्याकडे आहे, अशा शेतकऱ्यांनी बैलजोडीच्या मदतीने तर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने मशागतीची कामे पूर्ण केली. ४५ ते ४६ अंश एवढे तापमान असतानाही बळीराजा सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ३.३० ते ७ या वेळेत मशागतीची कामे पूर्ण करीत होता. आता ही कामे बहुतांश पूर्ण झाली आहेत.
पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाल्यानंतर आता पेरणीची जुळवाजुळव करण्यामध्ये शेतकरी मग्न आहे. पुसद तालुक्यात यंदा खरीपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना यासाठी बी-बियाणे, खते कमी पडणार नाही, याची चाचपणी कृषी विभाग कटाक्षाने घेत आहे. साधारणत: दरवर्षीचा अनुभव पाहता खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेवर धावपळ होते. अशा वेळी अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना पेरणीपासून वंचित राहावे लागते. दरवर्षी मागणीच्या तुलनेत या बियाण्यांचा पुरवठा हा कमी असतो. ही परिस्थिती यंदा बदलणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारल्या जात आहे. खरीप हंगामात बहुतांश शेतकरी सोयाबीनच्या पेरणीला पसंती देत आहेत. तीन ते साडेतीन महिन्यात या पिकांची काढणी होते. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. शिवाय साडेतीन महिन्यांनंतर सोयाबीनची काढणी केल्यानंतर त्याच शेतात रबी हंगामातील पिके घेण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. यंदा पाऊस वेळेवर होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकली असून, पेरणीसाठी सज्ज झालेला शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
बियाणे व खताबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता
गेल्या काही वर्षात दुय्यम दर्जाची बियाणे व खते बाजारात विक्रीसाठी येतात. यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये यावेळीसुद्धा साशंकता दिसून येत आहे. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन आवश्यक आहे. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांसोबत संवाद वाढवून त्यांना विश्वास देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खतांबाबत कोणतीही शंका आल्यास त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे गरजेचे आहे, परंतु अनेकवेळा तक्रारींची दखल घेतलीच जात नसल्याचे शेतकरी सांगतात.