दोन लाख हेक्टरवरील खरीप पीक धोक्यात
By Admin | Updated: September 10, 2016 00:46 IST2016-09-10T00:46:07+5:302016-09-10T00:46:07+5:30
महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाचे तब्बल दोन लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे.

दोन लाख हेक्टरवरील खरीप पीक धोक्यात
सर्वेक्षणाचे आदेश : पावसाअभावी ३१ हजार हेक्टर पीक उद्ध्वस्त
यवतमाळ : महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाचे तब्बल दोन लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३१ हजार हेक्टरवरील पीक हातचे गेले आहे. सुरुवातीला दमदार पावसाने सुखावलेला शेतकरी आता मात्र पुन्हा चिंतेत पडला आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
जिल्ह्यात प्रारंभी जोमदार अवस्थेत असलेले पीक नंतरच्या काळात करपण्यास सुरूवात झाली. महिना झाला तरी अनेक भागात पाऊस बरसला नाही. तेथे पीक हातातून जाणार आहे. काही ठिकाणी झाड आणि शेंगाही करपल्या आहेत. कृषी अधीक्षकांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अशा क्षेत्राचा आकडा ३१ हजार हेक्टर असल्याचा अहवाल पुढे आला आहे. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार हेक्टरवर सोयाबीनचे पीक आहे. यातील दोन लाख हेक्टरवरील पीक पाण्याअभावी करपत आहे. यामुळे सलग तीन वर्षांपासून नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मोठा फटका बसण्याचा धोका आहे.
गुलाबी बोंडअळी, उंटअळी, एलो मोझॅक आणि आता पावसाअभावी करपणाऱ्या पिकांनी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडे अशा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही सादर केले. अशा तक्रारग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे प्राधान्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. यासोबतच इतरत्र झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)