काँग्रेसमध्ये खांदेपालट
By Admin | Updated: March 10, 2016 03:19 IST2016-03-10T03:19:32+5:302016-03-10T03:19:32+5:30
काँग्रेस पक्षाने नुकतेच काही खांदेपालट केले. त्यात वणी, मारेगाव तालुक्यात काँग्रेस कमिटी, महिला आणि युवक पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली.

काँग्रेसमध्ये खांदेपालट
महिला, युवक शाखा : वणी, मारेगावात नवीन अध्यक्ष नियुक्त
वणी : काँग्रेस पक्षाने नुकतेच काही खांदेपालट केले. त्यात वणी, मारेगाव तालुक्यात काँग्रेस कमिटी, महिला आणि युवक पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्या करून काँग्रेसने पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस गलितगात्र झाल्याची ओरड होऊ लागली होती. पराभवाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही थोडी निराशा निर्माण झाली होती. त्यानंतर झालेल्या मारेगाव आणि झरी नगरपंचायतीतही पक्षाला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा निराश झाले होते. तथापि, वणीतील वसंत जिनिंग आणि इंदिरा सहकारी सूत गिरणीच्या निवडणुकीत बाजी मारून जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार यांनी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आता जिल्हाध्यक्ष कासावार यांनी वणी तालुका युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, मारेगाव तालुका व शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवीन कार्यकर्त्यांची नियुक्ती घोषित केली. या नियुक्त्यांवरून त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रावर पुन्हा आपले लक्ष केंद्रीत करून पक्षावर पकड निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. वणी आणि मारेगाव तालुक्यात त्यांनी नवीन नियुक्त्या करून नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ‘कामाला’ लागण्याचे निर्देश दिले आहे.
वणी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक यावर्षी होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षा जानेवारी-फेब्रुवारीत जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होऊ घातली आहे. या दोन निवडणूक समोर ठेवून काँग्रेसने नवीन नियुक्त्या केल्याचे समजले जाते. त्यामुळे खांदेपालट करून काँग्रेस निवडणुकीसाठी आत्तापासूनच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. पक्षाने आपली रणनीती तयार करणे सुरू केले आहे. भाजपाने महिनाभरापूर्वीच आपल्या तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यात जुनेच पदाधिकारी कायम राहिले. भाजपानेही नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पावले टाकण्यास सुरूवात केली. (कार्यालय प्रतिनिधी)