खैरगावच्या इसमाचा गळा चिरुन खून
By Admin | Updated: April 6, 2015 00:11 IST2015-04-06T00:11:21+5:302015-04-06T00:11:21+5:30
जुन्या वादात एका इसमाचे अपहरण करून तिघांनी त्याचा गळा चिरुन खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत वर्धा

खैरगावच्या इसमाचा गळा चिरुन खून
जुना वाद : प्रेत फेकले वर्धा नदीच्या पात्रात, तिघांना अटक
वडकी : जुन्या वादात एका इसमाचे अपहरण करून तिघांनी त्याचा गळा चिरुन खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत वर्धा नदीच्या पात्रात फेकून देण्यात आले. ही घटना राळेगाव तालुक्यातील खैरगाव-कासार येथे उघडकीस आली. पोलिसांंनी तिघांना अटक केली आहे.
चंद्रभान मारेगामा (६०) असे मृताचे नाव आहे. तर शंकर दादाराव राऊत (४०), रवी नारायण तागडे (४०), राजू बाबाराव उरवते (३५) सर्व रा. खैरगाव असे आरोपींची नावे आहे. चंद्रभान हा ३० मार्चच्या रात्री घरुन तीन मित्रांसोबत निघून गेला होता. पाच दिवस झाले तरी थांगपत्ता लागत नसल्याने त्याचा मुलगा मारोती याने वडकी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन शंका व्यक्त केली. पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासात पोलिसांनी शंकर राऊत, रवी तागडे आणि राजू उरवते या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना बोलते केले असता त्यांनी घटनाक्रम सांगितला. ३० मार्च रोजी चंद्रभान आपल्या घरी होता. त्यावेळी गावातीलच शंकर राऊत याने घराबाहेर बोलावून नेले. रवी तागडे याच्या मोटरसायकलवर बसून हे तिघे गेले. त्यानंतर राजू उरवते हा मित्रही गेला. तिघेही दुचाकीवरून सखी लोणी मार्गाने घेऊन गेले. एका शेतात चंद्रभानला दारू पाजली. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका दुप्पट्याने त्याचा गळा आवळला आणि धारदार शस्त्राने त्यानंतर गळा चिरला.
प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी या तिघांनी चंद्रभानचे प्रेत वर्धा जिल्ह्यातील बोपापूर गावच्या नदीच्या पात्रात पाण्यात फेकून दिले. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी चंद्रभानचा धडापासून शीर वेगळे असलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्या तिघांना अटक करून भादंवि ३०२, ३०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तिघेही आरोपी गावातीलच असून त्यांच्यात मैत्री होती. मात्र काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. या वादात चंद्रभानचा खून करण्यात आला. अधिक तपास वडकीचे ठाणेदार अमोल माळवे, सतीश राऊत, रमेश पिदूरकर, प्रवीण तालकोकुलवार करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून खुनाचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. (वार्ताहर)