महानिरीक्षकांच्या मुक्कामाने जुगाराला चाबी
By Admin | Updated: February 4, 2015 23:22 IST2015-02-04T23:22:29+5:302015-02-04T23:22:29+5:30
अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एस. उघडे तीन दिवस जिल्ह्यात मुक्कामी आहेत. त्यांचा दौरा असलेल्या भागातील अवैध धंद्यांना तूर्त जणू चाबी लावली गेली आहे.

महानिरीक्षकांच्या मुक्कामाने जुगाराला चाबी
यवतमाळ : अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एस. उघडे तीन दिवस जिल्ह्यात मुक्कामी आहेत. त्यांचा दौरा असलेल्या भागातील अवैध धंद्यांना तूर्त जणू चाबी लावली गेली आहे. तर दुसरीकडे यवतमाळ शहरासह अन्य भागातील धंदे खुलेआम सुरू आहेत.
वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने बुधवारपासून तीन दिवस महानिरीक्षक जिल्ह्यात आहेत. मारेगाव, कळंब, दारव्हा येथे ते निरीक्षण नोंदविणार आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी सावधगिरी म्हणून या तीन ठाण्याच्या हद्दीतील दारू, जुगार, मटका, अवैध प्रवासी वाहतूक यासारख्या वरकमाईच्या व्यवसायांना तूर्त कुलूप लावण्याचे फर्मान सोडले. मात्र त्यानंतरही शटर पूर्णत: बंद न ठेवता धंदेवाईक चोरट्या मार्गाने आपला ‘उद्योग’ चालविताना दिसत आहे. वणी विभागात महानिरीक्षक मुक्कामी असल्याने तेथे कुठेही धंदे खुलेआम दिसणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. वणीत महानिरीक्षकांना अवैध प्रवासी वाहतुकीचा गोंधळ दिसू नये म्हणून मार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले. या उलट स्थिती यवतमाळ आणि जिल्ह्यात अन्य भागात आहे. यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट, अप्सरा टॉकीज, शारदा चौक व अन्य भागातील मटका, जुगार जोरात सुरू आहे. कॉटन मार्केट चौकातील मटका केवळ भाड्यासाठी शिफ्ट करण्यात आला. शहरातील अन्य अवैध धंद्यांना महानिरीक्षकांच्या दौऱ्याची भीती नसल्याचे जाणवते. अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीतसुद्धा स्थिती वेगळी नाही. केवळ महानिरीक्षकांचा दौरा असलेल्या क्षेत्रातच तेवढी खबरदारी घेतली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)