शांतता राखा, पोलिसांना तपासाला वेळ द्या
By Admin | Updated: July 4, 2016 02:03 IST2016-07-04T02:03:17+5:302016-07-04T02:03:17+5:30
यवतमाळ पब्लिक स्कूल प्रकरणात कायदेशीर पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे.

शांतता राखा, पोलिसांना तपासाला वेळ द्या
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूल प्रकरणात कायदेशीर पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. त्यासाठी पालक, नागरिक, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी येथे केले.
ना. अहीर म्हणाले, वायपीएस प्रकरणात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. भक्कम पुरावे मिळविण्यावर व इतरांच्या अटकेवर भर आहे. त्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहे. ही परिस्थिती हाताळण्यात प्रशासन कमकुवत ठरल्याचे सांगताना अहीर यांनी लाठीचार्ज खेदजनक असल्याचे म्हटले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही सायंकाळी पत्रपरिषद घेऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनीही दारव्हा नाक्यावरील आंदोलनस्थळी भेट दिली. ते म्हणाले, या प्रकरणाच्या तपासासाठी उपअधीक्षकांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. संस्था सचिवांच्या शोधार्थ सर्च करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, असे सांगताना सिंघल यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
राज्य महिला आयोगाच्या सदस्या गीता ठाकरे या यवतमाळात दाखल झाल्या असून त्यांनी योग्य तपास व कारवाईची हमी देताना या प्रकरणाचा अहवाल आयोगाच्या अध्यक्षांना सादर करणार असल्याचे सांगितले. पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन तपासाबाबत माहिती दिली. हे प्रकरण कायदेशीर दृष्ट्या भक्कम बनवायचे असेल तर पोलिसांना तपासाला वेळ द्यावा लागेल, त्यासाठी नागरिकांनी शांतता राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान घटना उघडकीस आल्याच्या आज चौथ्या दिवशीही यवतमाळात तणावाची स्थिती होती. तोडफोड, जाळपोळ, दगडफेक, लाठीचार्ज केला गेला. त्यात पोलीस, पत्रकारांसह काही आंदोलक जखमी झाले. एका गंभीर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. लाठीचार्जमध्ये काही पत्रकारही जखमी झाले. मात्र ऐनवेळी एसडीपीओ राहुल मदने, पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण पत्रकारांच्या मदतीला धावले.