कपाशीवर रसशोषक किडींचे आक्रमण

By Admin | Updated: September 12, 2016 01:42 IST2016-09-12T01:42:32+5:302016-09-12T01:42:32+5:30

तालुक्यातील कपाशीचे पीक ऐन बहाराच्या अवस्थेत असतानाच पिकांवर सध्या रसशोषक किडींचा अचानक प्रादुर्भाव वाढल्याने कपाशीचे पीक आकसल्यासारखे झाले आहे.

Kaspashiv Rasushokar Kidi Invasion | कपाशीवर रसशोषक किडींचे आक्रमण

कपाशीवर रसशोषक किडींचे आक्रमण

शेतकरी धास्तावले : फवारणीसाठी महागड्या कीटकनाशकांचा करावा लागतो वापर
दारव्हा : तालुक्यातील कपाशीचे पीक ऐन बहाराच्या अवस्थेत असतानाच पिकांवर सध्या रसशोषक किडींचा अचानक प्रादुर्भाव वाढल्याने कपाशीचे पीक आकसल्यासारखे झाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात सतत बदल होत आहे. वातावरणातील या बदलामुळे कापूस पिकातील पात्या व फुलगळ वाढली आहे. रसशोषक किडींच्या अगमानामुळे शेतकरी धास्तावला आहे.
कीड नियंत्रणासाठी महागड्या किटकनाशकांचा वापर शेतकरी वर्ग सर्रास करताना दिसून येत आहे. रसशोषक किडींमुळे मावा, तुडतुडे, फुलकिडी, पांढरी माशी, पिठ्या ढेकुन, कोळी या किडींचा समावेश होत आहे. सध्या तालुक्यात कापूस पिकांवर प्रामुख्याने फुलकिडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसत आहे. इतर रसशोषक किडींचेही प्रमाण आढळत आहे. या किडी मुख्यत: पानाच्या खालच्या बाजुस राहून रसशोषण करीत असतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. याशिवाय या किडींचा प्रादुर्भाव झाडाचे कोवळे शेंडे, फुले व फळांवरसुद्धा आढळून येतो. काही रसशोषक किडी आपल्या शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर कॅप्नोडियम नावाची काळी बुरशी वाढते व त्याचा झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम होऊन पिकांचे उत्पादन व प्रत घटते.
दारव्हा तालुक्यात ३० हजार ५८२ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात रसशोषक किडींचे आक्रमण झाले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध किडकनाशकांचा विशेषत: महागड्या किटकनाशकांच्या फवारणीवर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. खासगी कंपन्यांचे कर्मचारी, कृषी केंद्रांच्या माध्यमातून गावोगावी आपल्या उत्पादनांचा प्रचार करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kaspashiv Rasushokar Kidi Invasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.