प्रेमाच्या त्रिकोणात कळंब पोलिसांची दमछाक
By Admin | Updated: November 2, 2016 00:58 IST2016-11-02T00:58:17+5:302016-11-02T00:58:17+5:30
लग्नाची पत्नी व एक मुलगी असतानाही नवऱ्याचे एका तरुणीशी सूत जुळले. प्रेमाच्या या त्रिकोणातील पती, पत्नी आणि ‘ती’

प्रेमाच्या त्रिकोणात कळंब पोलिसांची दमछाक
ठाण्यात गोंधळ : पत्नीला सोडून प्रेयसीसोबत विवाह करण्यास निघालेल्या पतीची ठाण्यातच धुलाई
गजानन अक्कलवार कळंब
लग्नाची पत्नी व एक मुलगी असतानाही नवऱ्याचे एका तरुणीशी सूत जुळले. प्रेमाच्या या त्रिकोणातील पती, पत्नी आणि ‘ती’ चक्क पोलीस ठाण्यात धडकले. तिघांचाही ठाण्यातच गोंधळ सुरू झाला. या तिघांनाही शांत करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. हा प्रकार पाहण्यासाठी ठाण्यात मोठी गर्दी उसळली होती.
येथील माथा वस्तीतील युवकाचा धामणगाव येथील तरुणीशी विवाह झाला. त्यांच्या संसारवेलीवर एक कळी फुलली. काही दिवसानंतर या युवकाचे गावातीलच एका तरुणीशी सूत जुळले. याच कारणावरुन त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. या त्राग्याला कंटाळून तिने माहेरचा रस्ता धरला. पत्नी माहेरी गेल्याची चांगलीच संधी त्याने साधली. प्रेयसीसोबत लग्न करायला तो निघाला. ही माहिती होताच पत्नीने भाऊ, वडील, आई , काका आणि नातेवाईकांना घेऊन कळंब गाठले.
युवकाने पे्रयसीसोबत ठाणे गाठले. याठिकाणी पत्नीने पती व प्रेयसीची पोलिसांसमक्ष यथेच्छ धुलाई केली. पतीविरोधात तक्रारही दाखल केली. काही वेळात प्रेयसीचे नातेवाईकही ठाण्यात धडकले. त्यांनी तिला घरी चालण्याची विनंती केली. परंतु ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. प्रियकराला सोडून कुठेही जाणार नाही, या भूमिकेवर ती ठाम होती तर, दुसरीकडे पत्नीही पतीला माझ्या स्वाधीन करण्याची विनंती पोलिसांना करीत होती. वेगवगेळ्या तऱ्हेने ती आपला संताप व्यक्त करीत होती. जवळपास दोन तास हा ड्रामा पोलीस ठाण्याच्या आवारात सुरु होता.
पत्नीने नातेवाईकांसोबत माथा वस्तीतील घराचे कुलूप तोडले. घरातील सर्व साहित्य गाडीमध्ये भरुन धामणगावला नेण्यात आले. दरम्यान, येथे पत्नीचे नातेवाईक व पतीच्या नातेवाईकांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. एकमेकांना मारहाण झाली. एकदुसऱ्यांची डोकी फोडण्यात आली. हा प्रकार चिघळत असल्याचे लक्षात येताच सहायक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली. नातेवाईकांना धामणगावकडे रवाना करण्यात आले. चार तासानंतर कुठे हे प्रकरण शांत झाले. दुसरीकडे विवाहित युवक व पे्रयसी फरार झाले. त्यांच्या शोधार्थ आता प्रेयसी व पत्नीचे कुटुंबही रवाना झाले.