कामठवाडाने जिंकले १० लाखांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:49 IST2019-08-13T21:49:17+5:302019-08-13T21:49:44+5:30
कामठवाडा गावाने ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धेत दारव्हा तालुक्यातून १० लाखांचा पहिला पुरस्कार पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यात गावाला पाणीदार बनविण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

कामठवाडाने जिंकले १० लाखांचे बक्षीस
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरीअरब : कामठवाडा गावाने ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धेत दारव्हा तालुक्यातून १० लाखांचा पहिला पुरस्कार पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यात गावाला पाणीदार बनविण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
यवतमाळपासून २१ किमी अंतरावरील कामठवाडा हे १२३९ लोकवस्तीचे असून बहुतांश भाग कोरडवाहू आहे. या शेतीला समृद्ध करण्यासाठी लोकसहभागातून जल पुनर्भरणाची प्रक्रिया गावकऱ्यांनी राबविली. शेतशिवारात ढाळीचे बांध, नाला खोलीकरण, शोषखड्डे निर्मिती, डिप सीसीटी, पेयजलाच्या विहिरीलगत शेततळे, नाला बांधबंदिस्ती, वृक्षारोपण, परसबाग ही कामे ४० दिवसांत गावकऱ्यांनी पुर्ण केली. लोकसहभागातून दीड किलोमिटरचा नाला खोल करून जिवंत करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या या परिश्रमाला पुरस्काराने पावती मिळाली. ११ आॅगस्टला पुण्यात १० लाखांचा हा प्रथम पुरस्कार सिने अभिनेता अमिर खान यांच्या हस्ते आणि सत्यजीत भटकर, किरण राव यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आला. कामठवाडाच्या सरपंच रेखा उमेश उके आणि ग्रामसेविका मनिषा बेले यांनी हा पुरस्कार स्विकारला.
कडक उन्हातही राबले गावकरी
७ एप्रिल ते २५ मे हा कडक उन्हाळ्याचा स्पर्धेचा कालावधी होता. तेव्हा ४५ अंश तापमानतही गावकºयांनी काम केले. सरपंच रेखा उमेश ऊके, ग्रामसेविका मनिषा बेले, उमेश उके यांचा पुढाकार मोलाचा राहिला. आकाश ढंगारे, प्रितम काळे, सुमित परचाके, सुमित ठोकळ, संदेश लोणारे, महेश टाले, निलेश परचाके, सपना परचाके, पुनम परचाके, सविता भुजाडे, सविता ऊके, तिमाजी घोडेस्वार, पवन काळे, शाम शिंदे, स्पर्धेचे समन्वयक पंकज चव्हाण, राजू कांबळे, योगेश बोबडे यांचे परिश्रम महत्वाचे ठरले. यापुर्वी गावाला आदर्श गाव, निर्मलग्राम पुरस्कार मिळाले आहेत. वॉटर कप स्पर्धा जिंकल्याबद्दल नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
पुरस्काराचा हा क्षण आयुष्यातील ऐतिहासिक होता. गावाच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. पुढेही असेच चांगले काम घडावे यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.
- रेखा उमेश उके, सरपंच, कामठवाडा