जिल्हा परिषदेत कळंबला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व
By Admin | Updated: April 10, 2017 01:55 IST2017-04-10T01:55:45+5:302017-04-10T01:55:45+5:30
जिल्हा परिषदेत मागील ५५ वर्षांच्या इतिहासात कळंब तालुक्याला नंदिनी दरणे यांच्या रुपाने दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व

जिल्हा परिषदेत कळंबला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व
गजानन अक्कलवार कळंब
जिल्हा परिषदेत मागील ५५ वर्षांच्या इतिहासात कळंब तालुक्याला नंदिनी दरणे यांच्या रुपाने दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. प्रवीण देशमुख यांनी मागील पंचवार्षिकमध्ये थेट अध्यक्ष म्हणून तालुक्याचे नेतृत्व केले.
जिल्हा परिषद निवडणुकीत कळंब तालुका विकास आघाडीने दोन जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील एक जागा जिंकली. एका जागेच्या भरवशावर पद मिळेल, याची कोणाला अपेक्षाही नव्हती. परंतु राजकीय समीकरण जुळविताना अनपेक्षितपणे प्रवीण देशमुख गटाला लॉटरी लागली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर नंदिनी दरणे यांची सभापतिपदी वर्णी लागणार याविषयी अटकले बांधली जात होती. ती शेवटी खरी ठरली. येणाऱ्या काळात कळंब तालुका विकास आघाडीच्या बांधणीत सभापतिपदाचा किती फायदा करून घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सावरगाव-कोठा गटातून नंदिनी दरणे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच लढविली. विजयी होत त्या सभापतिपदी विराजमान झाल्या.
यापूर्वी त्यांनी हिवरादरणे गावचे सरपंचपद भुषविले आहे. महिला पंचायतराज सक्षमीकरण अंतर्गत जिल्ह्यातील सरपंचाचे त्यांनी प्रतिनिधित्वही केलेले आहे. त्यांचे पती बालु पाटील दरणे हे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आहे. सहकार क्षेत्रात मोठे प्रस्थ मानले जातात. प्रवीण देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.