जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य... कळंबचा चिंतामणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 14:17 IST2017-08-27T14:15:29+5:302017-08-27T14:17:56+5:30
ऐतिहासिक, पौराणिक पार्श्वभूमि लाभलेल्या कळंबनगरीचे दैवत म्हणजे श्री चिंतामणी. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेला चिंतामणी कळंबच नव्हेतर जगभरात पसरलेल्या गणेशभक्तांचे आराध्य बनले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवासाठी कळंबनगरीत हजारो गणेशभक्तांनी गर्दी केली आहे.

जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य... कळंबचा चिंतामणी!
गजानन अक्कलवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब (जि. यवतमाळ) : ऐतिहासिक, पौराणिक पार्श्वभूमि लाभलेल्या कळंबनगरीचे दैवत म्हणजे श्री चिंतामणी. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेला चिंतामणी कळंबच नव्हेतर जगभरात पसरलेल्या गणेशभक्तांचे आराध्य बनले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवासाठी कळंबनगरीत हजारो गणेशभक्तांनी गर्दी केली आहे.
श्रीक्षेत्र कळंब येथील दक्षिणाभिमुख चिंतामणीची जगातील एकमेव मूर्ती असावी़, असे जाणकार दाव्याने सांगतात़ मूर्तीच्या दोन्ही बाजूला भगवान शंकराच्या दोन पिंडी स्वतंत्र गाभाºयात आहे़ तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभे राहताच पुरातन ‘चौमुखी गणेशमूर्ती’ भाविकांचे सर्वप्रथम लक्ष वेधून घेते़ या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे अखंड दगडात चारही दिशेला चार गणेशमुखे असून प्रत्येक मूर्तीचे हात एकमेकात मिसळलेले आहेत़ प्राचीन गढीत खोदकाम करताना ही दुर्लभ मूर्ती सापडल्याचे बुजूर्ग सांगतात.
ऐतिहासिक कळंब हे फार मोठे धर्मस्थळ असावे, हे सिद्ध करणारे अनेक पुरावे मिळतात़ कळंब हे प्राचीन काळापासून १४ चावड्या व ३२ महालांचे गाव म्हणून परिचित आहे़ बारा मारुतीचे कळंब हा उल्लेख सार्थ वाटतो़ कारण येथील परिसरामध्ये बारा मारुतीचे अस्तित्व आजही अबाधित आहे़ सोबतच कळंबनगरीमध्ये महर्षी गृत्समद ऋषींनी कापसाचा शोध लावल्याचा पौराणिक कथेत उल्लेख असल्याने या नगरीच्या महात्म्यात मोठीच भर पडली आहे़ तेराव्या शतकात इस्लामी आक्रमण व गोंड राजाच्या लढाईचे दाखले आजही चर्चिले जातात़ औरंगजेबाच्या राजवटीमध्ये या परिसरावर चांदबिबीची सत्ता होती़ १८४९ मध्ये नागपूरच्या भोसल्यांनी कळंब परिसरात असलेल्या जंगलाच्या व टेकडीच्या आश्रयाने इंग्रजांना चांगलेच जेरीस आणल्याचे इतिहारात नमूद आहे़ क्रांतिकारक राजगुरुही या भागात काही काळ भूमिगत होते़ राजगुरुंनी श्री चिंतामणीच्या मंदिरातच यवतमाळ जिल्ह्यातील क्रांतिकारी युवकांची गुप्त बैठक घेतली होती़, असे जाणकार सांगतात़ अध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक व संशोधनात्मक दृष्टीने अभ्यासयोग्य असलेल्या या परिसराचा आजच्या स्थितीत पाहिजे तसा विकास झालेला नाही़ त्यामुळे पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन या स्थळाचा विकास केल्यास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे केंद्रबिंदू ठरु शकतो.
३५ फूट खोल मंदिर!
चिंतामणी मंदिराचा परिसर बाहेरुन पाहिल्यास तत्कालीन शिल्पकारांचे कसब जाणवते. मंदिराचा बाह्य भाग एखाद्या शिवपिंडीप्रमाणे भासतो़ आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यावर उभे राहिल्यावर मंदिराचे प्रवेशद्वार दिसण्याऐवजी कळसच दृष्टीस पडतो़ कारण मंदिर भूपातळीपासून ३५ फूट खोलात आहे़ जणू काही गावाच्या खाली बसून ‘निरंकर विघ्नहर्ता’ चिंतामणी संपूर्ण गावाला आधार देत असावेत़, असा भास होतो़ मंदिरात प्रवेश करताना सर्वप्रथम दर्शन घडते ते पवित्र गणेशकुंडाचे़ हेच ते प्रसिद्ध कुंड की, ज्यातील पाण्याने गौतमाच्या शापामुळे गलातकृष्ठी इंद्र रोगमुक्त होऊन पुन्हा इंद्रपदावर आरुढ झाला़, अशी आख्यायिका आहे. गणेशकुंडाच्या समोरच मुख्य गाभाºयात देवेंद्र वरद भगवान श्री चिंतामणीची भव्य व आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेते़
भक्तांना आस गंगेची
कळंबच्या मंदिरात दर बारा वर्षांनी गंगा अवतरते़ यासंदर्भात एक अख्यायिका सांगितली जाते़ ती अशी, देवराज इंद्र ऋषी गौतमाच्या शापातून मुक्त झाल्याने तेथेच त्यांनी श्री चिंतामणीची स्थापना केली़ पूजनासाठी पृथ्वीवरील पाणी कसे वापरावे, या विचाराने त्यांनी प्रत्यक्ष स्वर्गातून श्री गंगेलाच आवाहन केले़ पूजन झाल्यानंतर तिला आज्ञा केली की, एका तपानंतर न चुकता श्री प्रभूला स्रान घालत राहावे़ श्रींच्या मूर्तीला पाण्याचा स्पर्श झाला की़, गंगेचे पाणी आपोआप ओसरू लागते़, हे विशेष़ ज्या चिंतामणीच्या कृपेने इंद्राचे पाप धुतले गेले त्या चिंतामणीला स्पर्श करुन स्वत: पापमुक्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे़ गंगा येण्याला आता एक तपाचा कालावधी लोटला आहे़ त्यामुळे भक्तांना गंगा अवतरण्याची प्रतीक्षा लागली आहे़