कळंबमध्ये पहिल्यांदाच काकड आरती

By Admin | Updated: November 7, 2016 01:12 IST2016-11-07T01:12:46+5:302016-11-07T01:12:46+5:30

आजच्या विज्ञान युगातही धार्मिक परंपरेचे महत्व टिकून आहे. त्यामुळेच गावखेड्यातील काकडा आरतीची परंपरा निरंतर सुरू आहे.

Kakad Aarti for the first time in Kalamb | कळंबमध्ये पहिल्यांदाच काकड आरती

कळंबमध्ये पहिल्यांदाच काकड आरती

टाळ मृदंगाचा स्वर : वृध्दांसह युवकांचा पुढाकार, चिंतामणी देवस्थान भक्त मंडळ
कळंब : आजच्या विज्ञान युगातही धार्मिक परंपरेचे महत्व टिकून आहे. त्यामुळेच गावखेड्यातील काकडा आरतीची परंपरा निरंतर सुरू आहे. यावर्षी तर प्रथमच कळंब शहरात चिंतामणी विश्वस्तांच्या पुढाकारातून काकडा आरतीला प्रारंभ झाला. टाळ मृदंग, चिपळ्या, शंख, तानपुरा, घंटानांद आणि झांजच्या स्वरांनी चिंतामणी नगरीतील नागरिकांची पहाटारंभ उल्हासित वातावरणात होत आहे.
कळंबच्या इतिहासात प्रथमच चिंतामणी देवस्थान, अनुसया देवस्थान, मोरया भक्तमंडळ व सत्यसाई भक्त मंडळाच्या पुढाकारातून नवीन काकडा आरतीला सुुरुवात झाली. टाळ, मृदंग, हरिनामाचा गजर करीत वृध्द महिला-पुरुष, युवक-युवती यात सहभागी असतात. पहाटे पाच वाजता श्री चिंतामणी मंदिरात सर्वजण एकत्र येतात. त्यानंतर घंटानांद करुन काकडे पेटऊन धार्मिक गीतांची सुरुवात होते. ‘जय जय राम कृृष्ण हरी...’ या भजनाने भक्तिमय वातावरणात नगरभ्रमणाला सुरुवात केली जाते. कडाक्याच्या थंडीतही पहाटे उठून अनवाणी पायांनी चालत मोठ्या भक्तीभावाने हरिनामाचा गरज केला जातो. यात परिसर भक्तीमय होऊन जातो. गावातील रोज एका मंदिरात काकडा पोहचतो. तेथे एका तालासुरात आणि मंजुळ आवाजात भजन कीर्तन आणि आरती म्हटली जाते. तेथून काकडा थेट श्री चिंतामणी मंदिरात पोहोचतो. तेथेही पुष्पांजली, प्रसादगीत व काकडा आरती व इतर धार्मिक विधी पार पाडल्यानंतर सर्वांना फराळ, चहापाणी देऊन आरतीचा समारोप होतो.
कोजागिरी पोर्णिमेपासून काकडा आरतीला प्रारंभ झाला. आरतीची समाप्ती कार्तिक पौर्णिमेला काल्याच्या कीर्तनानंतर प्रसाद वाटप करुन करण्यात येणार आहे. एक महिना चालणारा हा उत्सव निद्रिस्त देवांना जागविण्यासाठी केला जातो, असे म्हटले जाते. चिंतामणी देवस्थानात पांढऱ्या सूतापासून तयार केला जाणारा काकडा आरतीसाठी पेटविला जातो. तो सर्व भक्तांना दिला जातो. त्यानंतर टाळमृदंगाच्या तालावर आरतीला प्रारंभ होतो. काकडा आरतीच्या मार्गावर पहाटेपासूनच अंगणात सडासारवण करुन रांगोळ्या टाकल्या जातात. विशेष म्हणजे युवकांचा आरतीत मोठा सहभाग असतो. काकड आरतीसाठी संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kakad Aarti for the first time in Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.