घराघरात ज्येष्ठा गौरीच्या आगमनाची लगबग
By Admin | Updated: September 8, 2016 01:04 IST2016-09-08T01:04:41+5:302016-09-08T01:04:41+5:30
श्रीगणेशाच्या आगमनानंतर ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागले असून गुरुवारी ज्येष्ठा गौरीची घरोघरी स्थापना होणार आहे.

घराघरात ज्येष्ठा गौरीच्या आगमनाची लगबग
जय्यत तयारी : बाजारात वाढली खरेदीसाठी गर्दी, रेडिमेड मुखवट्यांना भाविकांकडून मागणी
पुसद : श्रीगणेशाच्या आगमनानंतर ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागले असून गुरुवारी ज्येष्ठा गौरीची घरोघरी स्थापना होणार आहे. यासाठी जंगी तयारी सुरू असून मुखवटे, साड्या, दागिने, हार, पडदे अशा प्रकारची तयारी करण्यात महिला व्यस्त आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वीपासूनच गौरीच्या आगमनाची तयारी घराघरात सुरू होते. विशेषत: मुखवट्यांची पाहणी केली जाते. गेल्या महिनाभरापासून नवीन मुखवटे बाजारात विक्रीला आले आहे. रंगीबेरंगी परंतु आकर्षक असे मुखवटे नजीकच्या काळातील वाढते आकर्षण आहे. पूर्वी सुकड्यांचे मुखवटे तयार केले जात होते. त्यावर रंगकाम करून चेहरा तयार करण्यात येत होता. सध्या रेडीमेड मुखवट्यांनी ही जागा घेतली आहे. पुसद शहरात लोहार लाईनमधील कारागिर कोथळ्या, मुखवट्यांचे कोठी तयार करतात. मुस्लिम कारागिर गौरी पूजेला लागणाऱ्या कोथळ्या, स्टॅन्ड तयार करतात. या ठिकाणी कोणताही जाती, धर्म अथवा भेदभाव दिसत नाही. प्रत्येकजण भक्तीभावाने गौरीसाठी लागणारे साहित्य खरेदी करतात. सध्या कोथळ्यांची किमत पाच हजारांच्या घरात तर कोठीची किमत जवळपास हजार रुपये जोडी आहे. विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे.
जुने मुखवटे रंगविण्यासाठी पाचशे ते सातशे रुपये मोजावे लागत आहे. कलावंतांनाही या काळात चांगला रोजगार मिळतो. अडीच दिवस चालणाऱ्या गौरी सणाला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक घरात भाद्रपद महिन्यात गौरीचे आगमन होते.
अनेकांकडे वंश परंपरेने गौरीची स्थापना केली जाते. घरात नवीन सून आली की सदर कुटुंब गौरीसाठी लागणारे साहित्य पुन्हा नव्याने खरेदी करते. आपल्या कुवतीनुसार लोक गौरीसाठी दागिने करतात. आजही अनेक कुटुंबांमध्ये गौरीला अस्सल सोन्याचे दागिने घातले जातात. यामध्ये महिलांची मोठी लगबग सुरू असते. गुरूवारी गौरीची स्थापना होणार असून यासाठी सर्वजण सज्ज झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)