मोरचंडीत होते व्यसनमुक्ती सहविचारसभा
By Admin | Updated: July 17, 2014 00:21 IST2014-07-17T00:21:37+5:302014-07-17T00:21:37+5:30
जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात दुर्गम भागात असलेल्या मोरचंडी येथे व्यसनाधिनतेमुळे पिढ्याच्या पिढ्या गारद झाल्या आहेत. गावची स्थिती सुधारण्यासाठी गावातीलच सुशिक्षित युवकांनी पुढाकार घेतला आहे.

मोरचंडीत होते व्यसनमुक्ती सहविचारसभा
यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात दुर्गम भागात असलेल्या मोरचंडी येथे व्यसनाधिनतेमुळे पिढ्याच्या पिढ्या गारद झाल्या आहेत. गावची स्थिती सुधारण्यासाठी गावातीलच सुशिक्षित युवकांनी पुढाकार घेतला आहे. गावात व्यसनमुक्ती सहविचार सभा घेवून घरोघरी जाऊन व्यसनमुक्तीचे महत्व पटवून दिले जात आहे.
डोंगरमाथ्यावर असलेल्या मोरचंडी येथे शासकीय नोकरीनिमित्त गावाबाहेर असलेल्या सुशिक्षित युवकांनी परिवर्तनाची नांदी केली आहे. गावात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने येथील युवा पीढीला व्यसनाधिनतेच्या अजगराने विळखा घातला आहे. तिशीच्या आतीलच अनेक तरुण केवळ व्यसनाधिनतेमुळे मृत्यूपंथाला लागले आहेत. ही स्थिती सुधारण्याचा निर्धार गावातीलच काही सुशिक्षित तरुणांनी वयोवृद्धांना विश्वासात घेऊन केला. त्यानंतर गावात घरोघरी जाऊन व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले जाऊ लागले. आश्चर्याची बाब ज्यांचा दिवस दारूसोबतच सुरू होतो, असे पूर्णत: व्यसनाच्या आहारी गेलेलेही या कामात सहभागी झाले. त्यांनी आज आमची झालेली अवस्था पहा, अशी भावनिक साद घालून दारू, जुगारासारख्या व्यसनांना बळी पडू नका, असे आवाहन केले. दारुच्या नशेत झालेल्या वादामुळे
अनेकांवर कोर्ट-कचेऱ्या करण्याची वेळ आली, काहींचा संसार उद्ध्वस्त झाला.
स्वयंप्रेरणेने दारू सोडणाऱ्यांचा जाहीररीत्या गावात सत्कार करण्यात येऊ लागला. व्यसनमुक्ती सहविचार सभा बोलवून प्रबोधनाचे कार्यक्रम सातत्याने घेतले जात आहे. अजूनही व्यसनमुक्तीसाठी गावात भरपूर काम करण्याची गरज आहे.
मात्र ही मोहीम हाती घेणाऱ्या गोकूळ राठोड, दत्ता माहुरे, ज्ञानेश्वर ब्रह्मटेके, ज्ञानेश्वर मुंडाले, सुभाष भरकाडे, कैलास चव्हाण त्यांच्यासह गावातील काही जणांनी वातावरण बदलण्याचा विश्वास प्राप्त झाला आहे. ही मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)