जिनिंगच्या जमिनीचे दर ३५८ रुपये चौरस फूट

By Admin | Updated: February 28, 2016 02:38 IST2016-02-28T02:38:35+5:302016-02-28T02:38:35+5:30

पुसद शहरातील मुख्य बाजारपेठेत भूखंडाचे दर पाच हजार रुपये चौरस फूट असताना शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगच्या जागेचे मूल्यांकन केवळ ३५८ रुपये चौरस फुटाने करण्यात आले.

Jingin's land rate is 358 square feet | जिनिंगच्या जमिनीचे दर ३५८ रुपये चौरस फूट

जिनिंगच्या जमिनीचे दर ३५८ रुपये चौरस फूट

अफलातून मूल्यांकन : बाजारभाव पाच हजार रुपये चौरस फूट
अखिलेश अग्रवाल पुसद
पुसद शहरातील मुख्य बाजारपेठेत भूखंडाचे दर पाच हजार रुपये चौरस फूट असताना शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगच्या जागेचे मूल्यांकन केवळ ३५८ रुपये चौरस फुटाने करण्यात आले. दुय्यम निबंधकाच्या या अफलातून मूल्यांकनावर आक्षेप घेत पुनर्मूल्यांकनाची मागणी करण्यात आली. त्यावरून पुणे येथील पणन संचालकांनी जिनिंगच्या मालमत्तेची सखोल चौकशी करून योग्य कारवाईचे आदेश दिले. यामुळे जिनिंग संचालकांची झोप उडाली आहे.
पुसद येथे शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगची जागा आहे. या संस्थेच्या व्यवस्थापकाने १३ आॅक्टोबर २०१५ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयाला पत्र दिले. त्यात कारला मार्गावरील फॅक्टरी नं. १, शेत सर्व्हेनंबर ५४/२, नवीन सिट नं. ८९, भूखंड क्र.३६२२, क्षेत्रफळ चार हेक्टर ०.५ नुसार आजच्या बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मिळावे, असे म्हटले होते. या अर्जासोबत संस्थेने सातबारा जोडले आहे. या अर्जानुसार दुय्यम निबंधकांनी ६ नोव्हेंबर २०१५ रोजी जिनिंगच्या शहरी जागेचे मूल्यांकन पत्र सादर केले. त्यात शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगचे एकूण क्षेत्र ४० हजार ५०० चौरस मीटर म्हणजे चार लाख २९ हजार ३०० चौरस फूट आहे. बाजारमूल्य दर वर्ष २०१५ चे अंमलबजावणी सूचना क्र.१५ ब नुसार आकारणी करून मूल्यांकन करण्यात आलेले अंतिम बाजार मूल्य १५ कोटी ३५ लाख ९५ रुपये निर्धारित करण्यात आले. म्हणजेच ३५८ रुपये चौरस फूट दर ठरविण्यात आला. विशेष म्हणजे सध्याचे बाजारभाव पाच हजार चौरस फुटाच्या आसपास आहे.
या मूल्यांकनावर ज्ञानेश्वर तडसे, यशवंतराव खैरमोडे, रजनीताई नाईक, जनार्दन पोले, नारायण पुलाते, नारायण अंभोरे यांनी आक्षेप घेत सहाय्यक निबंधकासह जिनिंगच्या अध्यक्षांना निवेदन दिले. जिनिंग प्रेसिंगने आपल्या अर्जामध्ये वस्तुनिष्ठ माहिती दिली नाही. त्यामुळे योग्य मूल्यांकन झाले नाही. सध्या मुख्य बाजारपेठेत अकृषक जमिनीचा दर पाच हजार रुपये चौरस फूट आहे. परंतु दुय्यम निबंधकांकडे वस्तुनिष्ठ माहिती सादर केली नाही. मूल्यांकनाबाबत आजपर्यंत कोणताही अर्ज संबंधितांकडे केला नाही. पुसद नगरपरिषदेने नाईक चौकातील भूखंड अडीच वर्षांपूर्वी लिलाव केला होता. त्या जागेचा भाव पाच हजार रुपये चौरस फूट मिळाला होता. तसेच आज शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरही भूखंडाचे दर दीड हजार रुपये चौरस फूट आहे. असे असताना जिनिंगचे मूल्यांकन अफलातून करण्यात आले आहे.
आजच्या बाजारभावानुसार जिनिंगच्या ४ लाख २९ हजार ३०० चौरस फुटाचे २ अब्ज १५ कोटी रुपये एवढे मूल्यांकन होते. असे असताना जिनिंगच्या भूखंडाचा दर ३५८ रुपये चौरस फूट असा निर्धारित करण्यात आला. संस्थेचे आर्थिक नुकसान होत असताना संचालकांनी आतापर्यंत यावर आक्षेप का नोंदविला नाही, या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. आता या प्रकरणी काय निर्णय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Jingin's land rate is 358 square feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.