येळाबाराच्या महिला वनरक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून
By Admin | Updated: January 10, 2017 01:05 IST2017-01-10T01:05:24+5:302017-01-10T01:05:24+5:30
महिला वनरक्षकाचा पतीनेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शहरालगतच्या जांब परिसरातील

येळाबाराच्या महिला वनरक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून
बेरोजगार पतीकडून छळ, वसतिगृहात आश्रय : मृतक जमादाराची मुलगी
यवतमाळ : महिला वनरक्षकाचा पतीनेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शहरालगतच्या जांब परिसरातील खरोली शिवारात सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. या घटनेने वन विभागासह शहरात एकच खळबळ उडाली.
पूनम रणजित भाटी (२७) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. पूनमचा विवाह २००६ मध्ये जांब येथील रणजित नरेश भाटी (३०) याच्याशी झाला होता. त्यावेळी रणजित हा औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीवर होता. दरम्यान लग्नानंतर पूनमला वन विभागात वनरक्षक म्हणून २०१५ मध्ये नोकरी लागली होती. ती सध्या वडगाव जंगल वनपरिक्षेत्रातील येळाबारा येथे विशेष सेवा रक्षक म्हणून कार्यरत होती. पत्नीला नोकरी लागल्याने रणजितने नोकरी सोडून दिली आणि दोघेही जांब येथे राहू लागला. पत्नी नोकरी करणारी आणि रणजित बेरोजगार असा संसार सुरू होता. त्यातूनच रणजितचा पुरुषी अहंकार जागृत झाला. पूनमचा छळ सुरू झाला. तिला मारहाण केली जात होती. या जाचाला कंटाळूनच पूनमने यवतमाळ येथील मुलींच्या वसतिगृहात आश्रय घेतला होता.
सोमवारी सकाळी रणजित मुलीच्या वसतिगृहात आला. त्याने पूनमला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून खरोली शिवारातील स्वत:च्या शेतात नेले. त्या ठिकाणी त्याने पूनमचा दगडाने ठेचून खून केला. या घटनेची माहिती होताच परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान रणजितचा चुलत भाऊ मनोज रमेश भाटी याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रणजितला ताब्यात घेतले. दरम्यान पूनमचे वडील सुदर्शन धांदू रा. रुद्रापूर ता. बिलोली जि. नांदेड यांना या घटनेची माहिती मिळाली. ते हदगाव ठाण्यात जमादार म्हणून कार्यरत आहे. या खुनात भाटी कुटुंबातील इतरही काही जण सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र वृत्तलिहिस्तोवर पोलिसांनी धांदू यांची तक्रार नोंदवून घेतली नव्हती. तपास ठाणेदार महिपालसिंग चांदा यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धनरे करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
-तर अनर्थ टळला असता
४दरम्यान रणजितकडून पैशासाठी तिला नेहमीच त्रास दिला जात होता. अनेकदा तो मुलींच्या वसतिगृहात जाऊन पूनमला भेटण्याचा प्रयत्न करीत होता. याच जाचाला कंटाळून पूनमने १५ दिवसापूर्वी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांनी नेहमीप्रमाणे तक्रार नोंदविण्याऐवजी समजूत काढून त्यांना परत पाठविले. त्याच वेळी पोलिसांनी रणजितविरुद्ध कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती.