जिल्ह्यातील सराफा व्यवसाय ठप्प
By Admin | Updated: February 11, 2016 02:52 IST2016-02-11T02:48:41+5:302016-02-11T02:52:05+5:30
दोन लाखांवरील सोने खरेदीसाठी पॅन कार्डची सक्ती मागे घ्यावी या मागणीसाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील सराफा व्यवसाय ठप्प
देशव्यापी बंद : पॅन कार्ड सक्तीचे प्रकरण
यवतमाळ : दोन लाखांवरील सोने खरेदीसाठी पॅन कार्डची सक्ती मागे घ्यावी या मागणीसाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक सहभागी झाले होते. संपूर्ण जिल्ह्यातील सराफा व्यवहार बुधवारी ठप्प झाले होते. यामुळे सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
केंद्र सरकारने दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड बंधनकारक केले आहे. त्यामुळे सराफा व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. ही सक्ती मागे घ्यावी आणि दहा लाख रुपयांच्यावर सोने खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड सक्ती करावी, अशी मागणी करीत सराफा व्यावसायिकांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला. यात यवतमाळ जिल्ह्यातील सराफा व्यावसायिक सहभागी झाले होते. यवतमाळ शहरातील सराफा लाईन आज दिवसभर बंद होती. तसेच वणी, पुसद, दारव्हा, दिग्रस, बाभूळगाव येथील सराफा व्यावसायिकही या बंदमध्ये सहभागी झाले होते. बाभूळगाव येथील सराफा व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होऊन तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनावर नितीन तातेड, गोपाल वर्मा, सुधीर रोकडे, सुरेश वर्मा, जितेंद्र तातेड, सम्राट अली, सुरेंद्र बहाड, महेश वर्मा, दिनेश रोकडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहे. (शहर वार्ताहर)
२५० दुकानांचा सहभाग
यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे २५० सराफा व्यावसायिक बुधवारच्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी झाले होते. सराफा व्यावसायिकांच्या मागण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर अर्थमंत्र्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सारंग भालेराव यांनी दिली. सराफा बाजारात दिवसभर शुकशुकाट दिसत होता.