जवळा येथील वाटमारीचा छडा, सहा लुटारू गजाआड
By Admin | Updated: April 20, 2017 00:16 IST2017-04-20T00:16:16+5:302017-04-20T00:16:16+5:30
तालुक्यातील जवळा येथे सेल्समनला लुटल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात आर्णी ....

जवळा येथील वाटमारीचा छडा, सहा लुटारू गजाआड
सेल्समनला लुटल्याचे प्रकरण : दोघे पसार, पोलिसांची कामगिरी
आर्णी : तालुक्यातील जवळा येथे सेल्समनला लुटल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात आर्णी पोलिसांना यश आले असून सहा लुटारूंना बुधवारी गजाआड करण्यात आले. यातील दोन जण फरार आहे. अटक आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.
सचिन किसन आत्राम (२५), अनिल बाबूसिंग पवार (२४), गजानन पुंडलिक लोंढे (२३), ओम गजानन बुटले (१८) सर्व रा. आर्णी आणि अविनाश भगवान लंगोटे (२०) रा. यवतमाळ असे अटकेतील लुटारूंची नावे आहे. तर चारुदत्त तावडे (२३) आणि दत्ता शंकर वानखेडे (२८) दोघे रा. आर्णी, अशी पसार असलेल्यांची नावे आहे. तालुक्यातील जवळा येथे २९ मार्च रोजी रात्री ८ वाजता निर्मल ट्रेडर्सचे सेल्समन प्रफुल्ल मेश्राम याला अडवून मारहाण करण्यात आली होती. त्याच्या खिशातील सात मोबाईल, ४६०० रुपये रोख आणि दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले होते. आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून अविनाश लंगोटे याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका बसताच इतर आरोपींची नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी यवतमाळ आणि आर्णी येथून पाच जणांना अटक केली. तर दोन जण अद्यापही पसार आहेत. अटकेतील आरोपींना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्याजवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनात भगवान तिडके, दिगांबर शेळके यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)