माहूर घाटात भाविकांची जीप कोसळली
By Admin | Updated: November 2, 2016 00:51 IST2016-11-02T00:51:11+5:302016-11-02T00:51:11+5:30
रेणुका देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप २५ फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर १३ प्रवासी जखमी झाले.

माहूर घाटात भाविकांची जीप कोसळली
चालक ठार : १३ भाविक जखमी, एक तरुणी अत्यवस्थ
माहूर : रेणुका देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप २५ फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर १३ प्रवासी जखमी झाले. यातील एक तरुणी अत्यवस्थ आहे. हा अपघात येथील रेणुका मंदिरालगतच्या वळणावर मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला.
जयदेव रा. सलगरा ता. मुखेड असे ठार झालेल्या जीप चालकाचे नाव आहे. तर प्रियंका शामराव टापरे (१८) रा. रूई ता. कंधार असे अत्यवस्थ तरुणीचे नाव आहे. कंधार आणि मुखेड तालुक्यातील भाविक रेणुका देवीच्या दर्शनासाठी मंगळवारी जीपने (क्र.एम.एच.२६-बी-९२३४) रेणुकागडाकडे जात होते.
त्यावेळी घाट चढत असताना एका वळणावर चालकाचे नियंत्रण गेले आणि जीप तीन-चार पलट्या खावून सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. हा प्रकार माहीत होताच परिसरातील भाविकांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, रेणुकादेवी संस्थानचे पी.डी. चव्हाण, इलियास बावाणी, राजू गंधेवाड, सुरेश शिंदे आदींनी जखमींना दरीतून बाहेर काढले. मात्र चालक जयदेवचा मृत्यू झाला होता. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉ. निरज कुंभारे यांनी उपचार केले. जखमींपैकी प्रियंका टापरे हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुसद येथे रवाना करण्यात आले. या घटनेने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दैव बलवत्तर म्हणून इतर भाविकांना किरकोळ दुखापत झाली. (वार्ताहर)