‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांचा दिल्लीत गौरव
By Admin | Updated: October 14, 2016 03:06 IST2016-10-14T03:06:26+5:302016-10-14T03:06:26+5:30
दिल्ली येथे झालेल्या आयईटीई-एटीसी-१६ या वार्षिक तांत्रिक संमेलनात स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींना गौरविण्यात आले.

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांचा दिल्लीत गौरव
यवतमाळ : दिल्ली येथे झालेल्या आयईटीई-एटीसी-१६ या वार्षिक तांत्रिक संमेलनात स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाच्या सुखदा धर्माधिकारी व मयुरी भगत यांचा यामध्ये समावेश आहे. आयईटीई यवतमाळ सब सेंटर आणि जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल टेक्निकल पेपर कॉन्टेस्ट-२०१६ चे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. यामध्ये सदर विद्यार्थिनींनी ‘झिग्बी टेक्नॉलॉजी अॅन्ड इटस् अप्लिकेशन इन आॅटोमॅटीक वॉटर टँक कंट्रोलिंग सिस्टीम फॉर प्रेस टँक्स’ या शोधनिबंधाचे सादरीकरण करून द्वितीय पारितोषिक पटकावले.
नवी दिल्लीतील संमेलनात या विजेत्याचा आयईटीईच्या अध्यक्ष स्मृती डागुर यांच्या हस्ते रोख पोरितोषिक व गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर आयईटीईचे नवनियुक्त अध्यक्ष लेप्टनंट जनरल डॉ.चंदेले, महासचिव मेजर जनरल पी.के. जगिया, तांत्रिक समिती अध्यक्ष डॉ.के.टी.व्ही. रेड्डी, पश्चिम विभाग को-आॅर्डीनेटर डॉ.जे.डब्ल्यू. बाकल, डॉ.गणशेखर राव आदी उपस्थित होते. या सोहळ्याला भारतातील विविध आयईटीई केंद्राचे पदाधिकारी, संशोधक, विशेष निमंत्रित आणि आयईटीईचे विद्यार्थी उपस्थित होते.
नॅशनल टेक्निकल पेपर कॉन्टेस्ट हा आयईटीई नवी दिल्लीचा वार्षिक कार्यक्रम आहे. भारतातील ६६ आयईटीई केंद्रापैकी यावर्षी आयईटीई यवतमाळ सब सेंटर, जेडीआयईटी यवतमाळ येथे आयोजन झाले. राष्ट्रीय पातळीवर आयोजित या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातील सुमारे ४० महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी १३७ शोधनिबंध नोंदवून सहभाग घेतला. यामध्ये प्रथम पारितोषिक आयआयआयटी अलाहाबादची निकिता अग्रवाल, जेडीआयईटी यवतमाळच्या सुखदा धर्माधिकारी व मयुरी भगत यांनी द्वितीय पारितोषिक तर तृतीय पारितोषिक शेगावच्या माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अश्विनी बी. माळी, अश्विनी आर. पाटील यांना घोषित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, आयईटीई यवतमाळ उपकेंद्राचे अध्यक्ष डॉ.संजय गुल्हाने यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)