तहसील परिसरात भरली जत्रा
By Admin | Updated: July 7, 2015 01:56 IST2015-07-07T01:56:00+5:302015-07-07T01:56:00+5:30
येथील तहसील परिसराला आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले.

तहसील परिसरात भरली जत्रा
झुंबड उडाली : उमेदवार व विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्रांसाठी धावाधाव
वणी : येथील तहसील परिसराला आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले. विद्यार्थी शालेय प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्र, तर ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवार विविध प्रमाणपत्रांसाठी या परिसरात येरझारा घालत होते.
दहावी, बारावीच्या निकालानंतर दरवर्षी तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी व पालकांची झुंबड उडते. त्यात रहिवासी, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रांचा समावेश असतो. ही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक सेतू केंद्रात गर्दी करतात. त्यामुळे निकाल लागताच येथील सेतू केंद्रात झुंबड उडाली आहे. विद्यार्थी, पालकांच्या गर्दीत आता ग्रामपंचायत निवडणुकीने भर घातली आहे.
तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ४२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी विविध प्रमाणपत्रांची इच्छुकांना गरज आहे. त्यासाठी आता इच्छुक उमेदवार तहसीलच्या चकरा मारत आहे. जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याची पावती मिळविण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे. अनेकांनी निवडणूक घोषित होण्यापूर्वीच प्रमाणपत्रे काढून ठेवली आहेत. मात्र बहुतांश इच्छक आता वेळेवर धावपळ करीत आहेत.
नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवार या प्रमाणपत्रांसाठी ऐनवेळी धावाधाव करताना दिसून येत आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी आता जेमतेम चार दिवस उरले आहे. त्यामुळे त्यापूर्वीच ही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. एनेवेळी त्यांची झुंबड उडाल्याने सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयाला आता जत्रेचे स्वरूप आले आहे. तहसील परिसरात वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. तथापि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी एकही अर्ज दाखल झालाच नव्हता. (कार्यालय प्रतिनिधी)
आठवड्याचा पहिला दिवस सोमवार ठरला गर्दीचा
सोमवार हा आठवड्यातील पहिलाच दिवस असतो. या पहिल्याच दिवशी तहसील परिसरात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे पहिलाच दिवस गर्दीचा ठरला. यासोबतच काही इच्छुक आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या परिसरात माहिती घेतानाही दिसून येत होते. अनेकांना आॅनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रियाच माहिती नाही. त्यामुळे अर्ज भरताना त्यांची धांदल उडत असल्याचे दिसत आहे.
उमेदवारांमुळे विद्यार्थी आले अडचणीत
ऐनवेळी ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुकांनी तहसील परिसरात गर्दी केल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहे. त्यांना वेळेवर कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. उमेदवारांची लगीनघाई सुरू असल्याने त्यांची तारांबळ उडत आहे. ‘आधी लगीन कोंडण्याचे’, या उक्तीप्रमाणे उमेदवार प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब होत आहे.