पत्नीची हत्या करणारा आरोपी अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:01 IST2019-03-10T22:00:42+5:302019-03-10T22:01:10+5:30
तालुक्यातील मुर्धोणी येथे मोलमजुरीसाठी आलेल्या एका इसमाने त्याच्या पत्नीचा दगडाने ठेचून खून केला होता. घटनेपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर शनिवारी जेरबंद करण्यात वणी पोलिसांना यश आले.

पत्नीची हत्या करणारा आरोपी अखेर जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील मुर्धोणी येथे मोलमजुरीसाठी आलेल्या एका इसमाने त्याच्या पत्नीचा दगडाने ठेचून खून केला होता. घटनेपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर शनिवारी जेरबंद करण्यात वणी पोलिसांना यश आले.
सूरज गेंदा भवेदी असे आरोपीचे नाव आहे. तो व त्याची पत्नी सोनावती काही दिवसांपूर्वी मुर्धोणी येथे मोलमजुरीसाठी आले होते. ४ मार्च रोजी महाशिवरात्रीला सोनावती शिरपूर येथे कैलास शिखर देवस्थानात दर्शनासाठी गेली होती. परत मुर्धोणीला आल्यानंतर सूरज व सोनावती या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादात सूरजने फरशी व विटेच्या तुकड्याने सोनावतीच्या पोटावर, छातीवर व कमरेवर जबर मारहाण केली. या मारहाणीत सोनावती जागीच मरण पावली. घटनेनंतर सूरज जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. गेल्या आठवडाभरापासून वणी पोलीस त्याच्या मागावर होते. तो मध्यप्रदेशातील त्याच्या गावी गेला असल्याच्या अंदाजावरून पोलिसांचे एक पथक तेथेही जाऊन आले. परंतु सूरज हाती लागला नाही. दरम्यान, शनिवारी तो घोन्सा मार्गावरील लिलावती ले-आऊटसमोरील जंगल परिसरात झुडूपाच्या आधाराने लपून असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली. माहितीवरून डी.बी.पथकाने संबंधित ठिकाण गाठले असता, पोलीस दिसताच सूरजने तेथून पुन्हा जंगलाकडे पळ काढला. डी.बी.पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन किलोमीटर सूरजचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक काकडे, डी.बी.पथक कर्मचारी सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहोडे, इमरान खान, नितीन सलाम, दीपक वांड्रस्कर, अमित पोयाम, अजय शेंडे आदींनी पार पाडली.