कारागृहात मेटल डिटेक्टर
By Admin | Updated: October 11, 2015 00:44 IST2015-10-11T00:44:37+5:302015-10-11T00:44:37+5:30
जिल्हा कारागृहात मोबाईल बाळगणे, बाहेरून गांजासह अंमली पदार्थ आत नेणे, शस्त्रे नेणे, बराकीत होणारी कैद्यांमधील भांडणे यासारखे प्रकार रोखण्यासाठी ...

कारागृहात मेटल डिटेक्टर
यवतमाळ : जिल्हा कारागृहात मोबाईल बाळगणे, बाहेरून गांजासह अंमली पदार्थ आत नेणे, शस्त्रे नेणे, बराकीत होणारी कैद्यांमधील भांडणे यासारखे प्रकार रोखण्यासाठी सुरक्षेच्या व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहे. सुरक्षेची मेटल डिटेक्टर, जामर, सीसीटीव्ही यासारखी अत्याधुनिक उपकरणे कारागृहात बसविण्यात आली आहे.
कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नुकताच राज्यभरातील कारागृहांमध्ये उपलब्ध सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी नव्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. नागपूर कारागृहातून चार कैदी पळाल्याच्या घटनेनंतर कारागृह प्रशासन सावध झाले असून सुरक्षा विषयक उपाययोजनांमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा कारागृहात पाच मोबाईल जामर बसविण्यात आले आहे. यापूर्वी तत्कालीन अपर महासंचालक मीरा बोरवनकर यांनी दिलेल्या अकस्मात भेटीत हा जामर बंद असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर जामरची संख्या वाढविण्यात आली. ४८ सीसीटीव्ही कलेक्टर कारागृहात बसविण्यात आले आहे. त्यावर सूक्ष्म नियंत्रण ठेवण्याचे व त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश डॉ. उपाध्याय यांनी दिले आहे. कारागृहात १० वॉकी-टॉकी देण्यात आले आहे. कारागृहामध्ये एक डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (डीएफएमडी) आणि तीन हॅडहोल्ड मेटल डिटेक्टर (एचएचएमडी) बसविण्यात आले आहे. याद्वारे कारागृहात प्रवेश करणाऱ्या कैदी-न्यायाधीन बंदीच नव्हे तर कर्मचाऱ्यांनाही तपासले जाते. एक डिजीसेट कारागृहात बसविण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांद्वारेच कारागृहात गांजा व अन्य अंमली पदार्थ नेण्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले होते. एका कैद्याने चक्क चप्पलमध्ये गांजा नेण्याचा प्रकारही केला होता. अशा घटनांना आता चाप बसणार आहे. बराकीमध्ये सीसीटीव्ही कॅमेराद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांकडून कारागृहात मोबाईल वापरण्याचा प्रयत्न होतो. बराकीतील असे मोबाईल ‘डिटेक्ट’ करण्यासाठी जिल्हा कारागृहात मोबाईल डिटेक्टर मात्र अद्याप उपलब्ध झाले नाही. सीसीटीव्हीद्वारेच त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. डिटेक्टरबाबतचे प्रशिक्षणही तेथील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)