जयहिंद क्रीडा मंडळ व हनुमान व्यायाम शाळा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:27 IST2018-12-04T21:27:02+5:302018-12-04T21:27:15+5:30
येथील वीर सावरकर मैदानावर सोमवारी रात्री रंगलेल्या सीएम चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील अंतिम सामन्यात जयहिंद क्रीडा मंडळ संघाने सुभाष क्रीडा मंडळ वडगावचा २८ विरूद्ध २ असा तब्बल २६ गुणांनी दणदणीत पराभव करून अव्वल स्थान पटकाविले. महिला गटात हनुमान व्यायाम शाळा यवतमाळ संघाने प्रथम, तर मातोश्री कन्या विद्यालय संघाने दुसरे स्थान प्राप्त केले.

जयहिंद क्रीडा मंडळ व हनुमान व्यायाम शाळा अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वीर सावरकर मैदानावर सोमवारी रात्री रंगलेल्या सीएम चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील अंतिम सामन्यात जयहिंद क्रीडा मंडळ संघाने सुभाष क्रीडा मंडळ वडगावचा २८ विरूद्ध २ असा तब्बल २६ गुणांनी दणदणीत पराभव करून अव्वल स्थान पटकाविले. महिला गटात हनुमान व्यायाम शाळा यवतमाळ संघाने प्रथम, तर मातोश्री कन्या विद्यालय संघाने दुसरे स्थान प्राप्त केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने यवतमाळ विधानसभा अंतर्गत ७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत सीएम चषक क्रीडा व कला महोत्सव आयोजित आहे. या अंतर्गत कबड्डी स्पर्धेत ६३ संघांनी सहभाग नोंदविला. पालकमंत्री मदन येरावार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या उपस्थितीत पुरुष गटातील अंतिम सामना खेळविण्यात आला. जयहिंद क्रीडा मंडळाने एकतर्फी झालेल्या या सामन्यात सुभाष क्रीडा मंडळाचा २६ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे यशवंत मोकलकर, जय मानकर, राहुल मडावी, नीकेश तारक, आशीष आत्राम, आकाश अतकरी, रवींद्र जाधव यांनी उत्कृष्ट खेळ केला.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात इंडियन आर्मी यावली संघाने कमलेश्वर क्रीडा मंडळ लोहारा संघाचा पराभव केला. महिला गटात हनुमान व्यायाम शाळा यवतमाळ संघाने मातोश्री कन्या विद्यालय संघाचा पराभव करीत प्रथम स्थान प्राप्त केले.
स्पर्धेचे संयोजक म्हणून अजय राऊत यांनी जबाबदारी सांभाळली. तांत्रिक पंच म्हणून ताराचंद चव्हाण, वाय. पठाण, अजय कोलारकर, प्रा. अनिल फेंडर, पप्पू रामपूरकर, मनोज येंडे, मोहन चव्हाण यांनी काम पाहिले. विजेत्या संघांना ८ डिसेंबर रोजी समता मैदानावर होणाºया कार्यक्रमात बक्षीस दिले जाणार आहे.