शेतकऱ्यांना कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकाची खैर नाही
By Admin | Updated: July 18, 2016 00:53 IST2016-07-18T00:53:32+5:302016-07-18T00:53:32+5:30
कर्ज मिळाले नाही म्हणून एखाद्या शेतकऱ्यांने आत्महत्या केली आणि तसे निदर्शनास आले तर संबंधित बँकेची खैर नाही.

शेतकऱ्यांना कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकाची खैर नाही
किशोर तिवारी : महागाव येथे कर्जवाटप मेळावा
महागाव : कर्ज मिळाले नाही म्हणून एखाद्या शेतकऱ्यांने आत्महत्या केली आणि तसे निदर्शनास आले तर संबंधित बँकेची खैर नाही. शेतकऱ्यांना बँका कर्ज देत आहेत म्हणजे काही उपकार करीत नाही. शासन तो पैसा बँकेला भरत आहेत. वेळ गेली नाही येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पूनर्गठन आणि नवीन कर्जाचे वाटप तत्काळ करावे असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंब मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.
महागाव येथे शुक्रवारी आयोजित सुलभ कर्ज वाटप मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय बँकांनी कर्ज वाटपाचे जेमतेम उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दिसत आहे. पूर्नगठन आणि नवीन पीक कर्जदार यांची संख्या तुलनेत बरीच मोठी दिसत आहे. स्टेट बँक शाखा महागाव, सेंट्रल बँक शाखा सवना, फुलसावंगी, युनियन बँक काळी ( दौ.), मुडाणा यांनी आपले उद्दीष्ट अद्याप पूर्ण केले नाही. त्या बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता पीक कर्ज वाटप करावे, असे निर्देश त्यांनी दिले. कार्यक्रमाला आमदार रजेंद्र नजरधने, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उपनगराध्यक्ष उदय नरवाडे, डी.बी. नाईक, शिवाजीराव देशमुख सवनेकर, तहसीलदार सी.एन. कुंभलकर, तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)