१० वर्षे लोटली, पुनर्वसनाचा प्रश्न कायम

By Admin | Updated: July 9, 2015 02:36 IST2015-07-09T02:36:40+5:302015-07-09T02:36:40+5:30

नागरिकांना नेहमी दक्ष राहण्यास सांगणारी नगरपरिषद ९ जुलै रोजी स्वत:च बेसावध राहिल्याने शहरापासून सात किमी

The issue of rehabilitation has remained for 10 years | १० वर्षे लोटली, पुनर्वसनाचा प्रश्न कायम

१० वर्षे लोटली, पुनर्वसनाचा प्रश्न कायम

प्रशासनाचे दुर्लक्ष : नांदगाव धरण बांधल्यास अर्ध्या शहराला होऊ शकतो पाणीपुरवठा
दिग्रस : नागरिकांना नेहमी दक्ष राहण्यास सांगणारी नगरपरिषद ९ जुलै रोजी स्वत:च बेसावध राहिल्याने शहरापासून सात किमी अंतरावरील नांदगव्हाण धरणाची कडा कोसळल्याने दिग्रस शहरामध्ये हाहाकार उडाला होता. ९५२ कुटुंबासह शहराच्या अर्ध्या भागातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जीव मुठीत घेऊन कशीबशी काढली. तरीसुद्धा चौघा जणांचा बळी घेऊनच महापूर शांत झाला. त्यावेळी बेघर झालेले शेकडो कुटुंब आजही मरणयातना सहन करीत रस्त्यावर जगत आहेत.
शासनाने नगरपरिषदेच्या माध्यमातून ८५२ कुटुंबीयांना घरकूल देण्याच्या उद्देशाने काही कार्य सुरू केले. परंतु मृतकाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. याच प्रवृत्तीमुळे १० वर्ष लोटूनसुद्धा हाच प्रश्न कायम आहे. ९ जुलै २००५ चा तो दिवस आजही अनेकांना आठवतो. २००४ साली पाऊस कमी झाल्याने नागरिक चिंतेत होते. अशातच ८ जुलै २००५ रोजी शहरासह संपूर्ण तालुक्यात धो-धो पाऊस पडला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. पडलेल्या पावसामुळे शहरातील धावंडा व मोरना नदीला पूर आला. बऱ्याच दिवसानंतर आलेल्या पुराला पाहण्याची उत्सुकता अनेकांना होती. रात्रीचे ९ वाजता देखील अनेक जण पूर पाहण्यासाठी धावंडा नदी तीरी जमले होते. परंतु त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. अचानक धावंडा व मोरना नदीने उग्र रूप धारण करून दिशाहीन प्रवाह सुरू करून देवनगर, जिजामाता नगर, पोळा मैदान, जिनगरपुरा, बैद्यनाथ नगर, संभाजी नगर, मोती नगर, गंगानगर, विठ्ठल नगर, शास्त्रीनगर आदी भागात महापूर शिरला. अनेकांचे पाळीव प्राणी, घरातील मौल्यवान वस्तू, अन्नधान्य व इतर साहित्य वाहून गेले. १४ निष्पाप नागरिकांचा बळीसुद्धा या महापुराने घेतला.
१४ बळी जाणाऱ्या कुटुंबीयांच्या दु:खाला पारावार राहिला नाही, त्यांचा आक्रोश गगनाला भिडत होता. नगरपरिषदेने कोणतीही सावधगिरीची सूचना दिली नव्हती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या भिंतीवर कचरा व गाळ जमा झाल्याने पाण्याचा प्रचंड दाबाने धरणाच्या कडा कोसळल्या आणि त्यामुळेच धावंडा नदीला महापूर आला होता. ९५२ कुटुंब यामध्ये बेघर झाले, अद्यापही ते पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या धाराशाही पडलेल्या नांदगव्हाण धरणाचे पुनर्वसन आवश्यक झाले आहे. नांदगव्हाण धरण पुन्हा एकदा बांधल्यास कोणताही खर्च न करता अर्ध्या शहराला या धरणाच्या पाण्याचा पुरवठा दररोज करता येऊ शकतो. उर्वरित अर्ध्या शहराला अरुणावती धरणामधील पाण्याचा पुरवठा करता येऊ शकतो. हे धरण पुन्हा बांधल्यास विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेलच शिवाय दिग्रस शहराची पाण्याची समस्या सुटेल. अनेक शेतांचे सिंचनसुद्धा होऊ शकेल. (प्रतिनिधी)

Web Title: The issue of rehabilitation has remained for 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.