इसापूरचे भूकंपमापक यंत्र १५ वर्षांपासून बंद
By Admin | Updated: April 27, 2015 02:00 IST2015-04-27T02:00:06+5:302015-04-27T02:00:06+5:30
गुजरातमधील भूज, कोयना, बीड एवढेच नाही तर जपान, इंडोनेशियात झालेल्या भूकंपाची नोंद घेणाऱ्या पुसद तालुक्यातील इसापूर धरणावरील ....

इसापूरचे भूकंपमापक यंत्र १५ वर्षांपासून बंद
ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ
गुजरातमधील भूज, कोयना, बीड एवढेच नाही तर जपान, इंडोनेशियात झालेल्या भूकंपाची नोंद घेणाऱ्या पुसद तालुक्यातील इसापूर धरणावरील भूकंपमापक यंत्रणा गत १५ वर्षांपासून बंद आहे. जुजबी दुरुस्तीसाठी नाशिकला गेलेले यंत्र अद्यापही परतच आले नाही. नेपाळसह देशात झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर इसापूर धरणावरील या भूकंपमापक यंत्रणेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील या धरणावर १९९० च्या दरम्यान पाटबंधारे विभागाने भूकंप मापक यंत्रणा उभारली होती. ३०० चौरस फूट आकाराच्या खोलीत पाच लाख रुपये खर्च करून भूकंप मापक मशीन बसविली होती. ही मशीन जपानमधून आणण्यात आली होती. भारतासह जगात अलिकडच्या काळात झालेल्या भूकंपाच्या नोंदी येथील यंत्रावर घेतल्या जात होत्या. जगात कुठेही भूकंप झाला की, त्याची नोंद येथे होत होती. भूकंप केव्हा झाला, कुठे झाला, किती अंतरावर झाला त्याचा केंद्र बिंदू किती आहे. तीव्रता किती याची नोंद होत होती. २४ तास सुरू राहणाऱ्या या मशीनवर दररोज सकाळी विशिष्ट कागद लावून माहिती घेतली जात होती. या ठिकाणी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली होती. या भूकंप मापकाने गुजरातमध्ये झालेल्या भूज, कोयना धरणातील मुदखेड, जपान, इंडोनेशिया आदी भूकंपाची नोंद घेतली होती. पुणे येथील भूकंपमापक यंत्राच्या तोडीचे हे यंत्र होते. मात्र सुमारे १५ वर्षापूर्वी भूकंप मापक यंत्र अचानक नादुरुस्त झाले. दुरुस्तीसाठी ते नाशिकला पाठविण्यात आले. मात्र ते यंत्र अद्यापही दुरुस्त होऊन परत आले नाही. या यंत्राच्या मोटारमध्ये बिघाड झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
त्यावेळी दुरुस्तीसाठी केवळ ५० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे इसापूर धरणावरील भूकंपमापक यंत्र दुर्लक्षित झाले. जलसंपदा विभागानेही याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान येथील केंद्रात पाच वर्षापूर्वी चोरी होऊन १२ लाख रुपये किंमतीची यंत्रणा चोरीस गेली होती. या चोरीचाही अद्याप थांगपत्ता नाही.
शनिवारी नेपाळसह भारतात झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने जग हादरुन गेले. शेकडो लोकांचे प्राण गेले. या भूकंपाचे धक्के चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला आदी शहरांनाही जाणवले. इसापूर येथील भूकंपमापक यंत्रणा सुरू असती तर यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाची तीव्रता नेमकी किती होती हे कळू शकले असते.