पाण्यासाठी निधीची चणचण

By Admin | Updated: February 19, 2015 00:11 IST2015-02-19T00:11:45+5:302015-02-19T00:11:45+5:30

उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाई निवारणासाठी नगरपरिषदेला निधीची चणचण भासत आहे. शासनाकडे सहा कोटींची मागणी करूनही एक छदामही नगरपरिषदेला अद्याप प्राप्त झाला नाही.

Irrigation of water | पाण्यासाठी निधीची चणचण

पाण्यासाठी निधीची चणचण

वणी : उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाई निवारणासाठी नगरपरिषदेला निधीची चणचण भासत आहे. शासनाकडे सहा कोटींची मागणी करूनही एक छदामही नगरपरिषदेला अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आज बुधवारी नवीन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे शहराची जीवनदायीनी असलेली निर्गुडा नदी जानेवारीतच आटली आहे. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील मध्यम प्रकल्पावर या नदीचे भवितव्य अवलंबून आहे. प्रकल्पातून पाणी सोडले तरच, ते नागरिकांना मिळू शकणार आहे. नगरपरिषदेने संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ चार कोटी ९0 लाख ते पाच कोटी ९0 लाखांची मागणी केली होती. मात्र यापैकी एक छदामही अद्याप नगरपरिषदेला प्राप्त झाला नाही.
पाणीटंचाई निवारणासाठी शहरात १२ नवीन ट्युबवेल मंजूर करण्यात आले आहे. मात्र त्यासाठीही अद्याप निधी प्राप्त झाला नाही. यातील चार ट्युबवेल निर्गुडा नदीच्या पात्राजवळ खोदण्यात येणार होत्या. नदीच्या जॅकवेल परिसरातील बंधाऱ्यांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार होती. नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार होती. सोबतच अत्याधिक टंचाईग्रस्त परिसराला टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. निर्गुडा नदीशिवाय शहरात इतरत्र आठ ट्युबवेल खोदण्याचा मानस होता. या सर्व कामांसाठी थेट पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांकडे उपाययोजना करण्यासाठी पाच कोटी ९0 लाखांची मागणी करण्यात आली होती. सोबतच मार्चनंतर शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र नगरपरिषदेला अद्याप पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून एक पैकाही मिळाला नाही. सध्या नवरगाव धरणातून आरक्षित केलेल्या पाण्यावर शहरवासीयांची तहान भागविली जात आहे. या धरणातून दोन दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच पुरणार आहे. त्यानंतर शहरात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
केंद्रीय राज्यमंत्र्यांना घातले साकडे
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काही नगरसेवकांनी केंद्रीय खत राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पाणी पुरवठा विभाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे. नगरपरिषदेच्या कृती आराखड्याला मंजुरात देण्यासाठी त्यांनी सहकार्य करण्याची मागणी नगरसेवक सिद्दीक रंगरेज, अभिजित सातोकर यांनी केली आहे. निधी उशीरा प्राप्त झाल्यास पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना रखडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नगरपरिषदेने २६ डिसेंबरलाच कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्याला मंजुरी प्राप्त होईस्तोवर आराखड्याचा विहित कालावधी संपुष्टात आल्यास संभाव्य पाणीटंचाई कशी दूर होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
निधीसाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला
नगरपरिषदेने पाणीटंचाई निवारणासाठी तत्काळ निधी मिळावा म्हणून आज बुधवारी पुन्हा निधीसाठी नवीन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. शहरातील १२ बोअरसाठी तातडीने ३0 लाख रूपये देण्याची मागणी त्यातून करण्यात आली आहे. उपाययोजनांसाठी अद्याप एकही पैसा मिळाला नसल्याने निधीची चणचण जाणवत आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे सर्वच उपाययोजना रखडल्या आहेत. परिणामी पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता बळावली आहे. आता जेमतेम तीन महिने कालावधी आहे. त्यात उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे.
नदी सफाई, बंधाऱ्यासाठी ४० लाख
निर्गुडा नदीच्या स्वच्छतेसाठी व बंधाऱ्यांची उंची वाढविण्यासाठी नगरपरिषदेने जनरल फंडातून ४0 लाखांची तरतूद केली आहे. या निधीतून नदीच्या सफाईला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे नदीत पाणी साचून काही काळ तरी पाणीटंचाईला रोखून धरण्यात यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. नदीत पाणी साचून राहिल्यास नागरिकांना पाणी मिळू शकणार आहे. या निधीतून नदीतील काही बंधाऱ्यांची उंची वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गोपिचंद पवार यांनी दिली. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

Web Title: Irrigation of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.