कालव्यातच अडकले सिंचन
By Admin | Updated: January 19, 2017 01:12 IST2017-01-19T01:12:56+5:302017-01-19T01:12:56+5:30
मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांच्या कालव्यांची तालुक्यात प्रचंड दुरावस्था झाली असून कालव्यातून पाणी शेतात पोहोचत नसल्याने सिंचन रखडले आहे.

कालव्यातच अडकले सिंचन
रबी धोक्यात : कालव्यांची दुरावस्था, पुसद तालुक्यातील शेतकरी अडचणीत
पुसद : मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांच्या कालव्यांची तालुक्यात प्रचंड दुरावस्था झाली असून कालव्यातून पाणी शेतात पोहोचत नसल्याने सिंचन रखडले आहे. परिणामी पुसद तालुक्यातील रबी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असून शेतकरीही अडचणीत आहे.
पुसद तालुक्यात इसापूर प्रकल्पासह अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पावरून कालव्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती नसल्याने कालव्यांची दुरावस्था झाली आहे. कालव्यात ठिकठिकाणी झुडपे वाढले आहे. अनेक ठिकाणचे गेट चोरीला गेले आहे. दरवर्षी कालवा दुरुस्तीच्या नावावर येणारे पैसे उपयोगी लागत नाही. त्यामुळे कालव्याची अवस्था दयनीय झाली आहे.
यावर्षी मुबलक पाऊस झाल्याने सर्व सिंचन प्रकल्पात मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली. परंतु आता भारनियमनामुळे सिंचन करणे कठीण जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेताजवळून प्रकल्पाच्या वितरिका गेल्या आहे. य वितरिकेतून पाणी मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु कालव्याच्या अवस्थेमुळे शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही, तर दुसरीकडे धरणातून सोडलेले पाणी थेट वाहून जात आहे. अनेक ठिकाणी कालवे फुटल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरते. आवश्यकता नसताना अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
पुसद तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्याची क्षमता येथील प्रकल्पांमध्ये आहे. परंतु प्रकल्पाच्या कालव्यांकडे कुणाचेही लक्ष नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभारण्यात आले. कालवे बांधण्यात आले. परंतु या कालव्याचे पाणी अद्यापही टेलपर्यंत जात नाही. ठिकठिकाणी असलेले गेट चोरीस गेले आहे. या चोरट्यांचा शोध घेतला जात नाही. दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी कालवे बुजविले आहे. अशा शेतकऱ्यांनाही तंबी दिली जात नाही. एकंदरीत पुसद तालुक्यातील सिंचन कालव्याच्या दुरावस्थेत रखडले आहे. एकंदरीत सिंचनाच्या दुरावस्थेकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. (प्रतिनिधी)