गांधीनगर रस्ता देतोय अपघातास निमंत्रण
By Admin | Updated: September 26, 2016 02:42 IST2016-09-26T02:42:53+5:302016-09-26T02:42:53+5:30
यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील गांधीनगर ते मोहदा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

गांधीनगर रस्ता देतोय अपघातास निमंत्रण
डोंगरखर्डा : यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील गांधीनगर ते मोहदा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सात ते आठ किलोमीटर या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. सदर मार्गावरील खड्डे एक ते दीड फूट खोल आहे. शिवाय पसाराही मोठा आहे. त्यातून गेलेली अनेक वाहने क्षतिग्रस्त झाली आहेत. एवढे कमी अंतर पार पाडण्यासाठी ४० ते ४५ मिनिट एवढा वेळ लागतो.
सदर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या मार्गाची स्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चालली आहे. दरम्यान, या रस्त्याची डागडुजी होत आहे. मात्र त्यातही मातीमीश्रित गिट्टी वापरली जात आहे. एकूणच सदर काम थातुरमातूर सुरू आहे. गांधीनगर ते माहेदा या मार्गाचा वापर मारेगाव, पांढरकवडा, झरी, कळंब आणि राळेगाव तालुक्यातील अनेक वाहनधारक करतात. बाहेर जिल्ह्यातील वाहनेही या मार्गावरून धावतात. गेली अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात साचलेल्या पावसामुळे खड्ड्यांचा पसारा वाढत गेला. सदर मार्गाची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)