नानवाणीकडील दरोड्याचा विविध पैलूंनी तपास
By Admin | Updated: June 29, 2016 02:25 IST2016-06-29T02:25:50+5:302016-06-29T02:25:50+5:30
येथील केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज नानवाणी यांच्या घरी रिव्हॉल्वरच्या धाकावर...

नानवाणीकडील दरोड्याचा विविध पैलूंनी तपास
रेखाचित्र जारी : मोबाईलवर बोलताना आरोपी सीसीटीव्हीत कैद, मजुरांवरही वॉच
यवतमाळ : येथील केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज नानवाणी यांच्या घरी रिव्हॉल्वरच्या धाकावर पडलेल्या दरोड्याचा विविध पैलूंनी पोलीस तपास करीत आहे. संशयासोबतच तांत्रिक बाजूही तपासून पाहिल्या जात आहे.
नानवाणी यांच्याकडे विविध व्यवसायांच्या माध्यमातून ८० ते ९० मजुरांचा राबता आहे. या मजुरांमधून कुणी तर हे कृत्य केले नाही ना, याची तपासणी पोलिसांच्या स्तरावर सुरू आहे. संशयित वाटणाऱ्या मजुरांवर गुप्त पद्धतीने ‘वॉच’ ठेवला जात आहे. तीन दरोडेखोरांपैकी एकाने आपले तोंड झाकले होते. त्यामुळे हा नानवाणी परिवाराच्या ओळखीतील तर नसावा ना अशी शंका पोलिसांना ंआहे. त्यामुळे तो कोण, कुणी मजूर तर नाही या दृष्टीने तपास केला जात आहे. नानवाणी यांच्या शेजारील घरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तिघांपैकी एक जण मोबाईलवर बोलताना कैद झाला आहे. त्यामुळे घटनेच्यावेळी त्या भागातून डायल झालेल्या सुमारे ३० हजार मोबाईल क्रमांकाची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत १७ ते १८ हजार क्रमांकाची तपासणी झाल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येते. नानवाणी यांचा मुलगा सारांश याने एका दरोडेखोराचा चेहरा पाहिला आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून रेखाचित्र जारी करण्यात आले. गुन्हेगारी वर्तुळात तशा वर्णनाच्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
नानवाणी यांच्याकडील दरोड्यात दोन जण बाहेरील तर एक जण लोकल सदस्य असावा असा दाट संशय पोलिसांना आहे. पोलीस सर्व पैलूंनी याचा तपास करीत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही या तपासात मदत घेतली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दरोडा नव्हे घरफोडी - एसपी
भाजपाचे नगरसेवक मोहन देशमुख यांच्या गिलाणीनगर स्थित घरी रविवारच्या रात्री झालेली घटना ही दरोडा नव्हे तर घरफोडी असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वास्तविक चौकीदारावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील क्रूरता ही व्यावसायिक दरोडेखोरांनाही लाजविणारी आहे. डोक्यावर दहा टाके पडलेल्या चौकीदाराला वेळीच मदत मिळाली नसती तर कदाचित त्याचा जीवही गेला असता. या घटनेतील क्रुरता पाहूनच ‘लोकमत’ने दरोडा असा उल्लेख केला आहे. शिवाय या घरफोडीत नेमके किती लोक सहभागी आहे हे, स्पष्ट झालेले नाही. पाच लोकांचा सहभाग असेल तरच दरोडा हा निकष असला तरी गुन्हेगारांच्या कृतीकडे पाहणेही तेवढेच महत्वाचे ठरते.