सात कोटींच्या गैरप्रकाराची चौकशी पुसद एसीएफकडे

By Admin | Updated: August 2, 2015 02:28 IST2015-08-02T02:28:40+5:302015-08-02T02:28:40+5:30

वाशिम वनपरिक्षेत्रात जलसंधारण व रोपवनात सात कोटी ३० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षकांकडे करण्यात आली होती.

Investigation of seven crore rupees in ACF | सात कोटींच्या गैरप्रकाराची चौकशी पुसद एसीएफकडे

सात कोटींच्या गैरप्रकाराची चौकशी पुसद एसीएफकडे

पुसद : वाशिम वनपरिक्षेत्रात जलसंधारण व रोपवनात सात कोटी ३० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षकांकडे करण्यात आली होती. यावरून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश २८ जुलै रोजी देण्यात आले आहे.
या चौकशीसाठी पुसद येथील सहायक वनसंरक्षक के.आर. राठोड यांच्या नेतृत्वात दोन सदस्यीय समिती गठित करण्यात आली. त्यात अकोला वनविभागातील मंगरुळपीरचे सहायक वनसंरक्षक आर.जे. बोंडे (संरक्षण) यांचाही समावेश करण्यात आला आहे. या दोनही अधिकाऱ्यांना कामांच्या तपासणीची विभागणी करून देण्यात आली आहे. राठोड यांना वाशिम परिक्षेत्रातील पूर्वीचे वाशिम व किन्हीराजा वर्तुळातील कामे व पुनर्रचेनंतरच्या वाशिम वर्तुळातील कामांची तपासणी करावी लागणार आहे. तर बोंडे यांच्याकडे पुनर्रचनेपूर्वीच्या अमाना व रिसोड वन वर्तुळातील कामे तसेच पुनर्रचनेनंतरच्या रिसोड वन वर्तुळातील कामांच्या तपासणीची जबाबदारी दिली गेली आहे.
सात कोटी ३० लाख रुपयांच्या या प्रकरणात चौकशीच्या काही टिप्स् देण्यात आल्या आहेत. मोजमाप पुस्तिकेप्रमाणे बंधाऱ्याची एकूण संख्या मोजून त्यापैकी पाच टक्के बंधाऱ्याचे मोजमाप घेण्यात यावे, रॅन्डम पद्धतीने बंधाऱ्याची निवड करावी, २,२२,४२ अशा पद्धतीने बांधाची निवड करावी, मोजमाप पुस्तिकेत नमूद असल्याप्रमाणेच पुन्हा मोजमाप घ्यावे, टीसीएमच्या एकूण लांबीची मोजणी करावी आदी सूचना चौकशी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
‘आरएफओ’ बी.के. चव्हाण यांचे पुसद विभागातही अनेक कारनामे
वाशिममधील सात कोटी ३० लाखांच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप असलेले वन परिक्षेत्र अधिकारी बी.के. चव्हाण यांचे पुसद विभागातही अनेक कारनामे आहेत. गेल्या १५ ते २० वर्षांपासून ते वेगवेगळ्या पदावर पुसदमध्ये कार्यरत होते. ते पुसदमध्ये तीन वर्षे वन परिक्षेत्र अधिकारी होते. या काळात खंडाळा भागात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड झाली. पाणलोटच्या कामाच्याही अनेक तक्रारी होत्या. वनपाल पदावरून बढती देत त्यांना मेळघाटात आरएफओ नेमण्यात आले. मात्र तेथे न जाता ते सहा महिने आजारी रजेवर राहिले. त्यानंतर त्यांनी पुन्हा पुसदमध्ये नियुक्ती मिळविली. वाशिमला तीन वर्ष पूर्ण झाल्याने चव्हाण यांना यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. मात्र तेथील सत्ताधारी राजकीय नेत्याने चव्हाण यांच्या नियुक्तीस विरोध दर्शविला. त्यांना रुजू करून घेऊ नये, अशा सूचना वनवृत्त कार्यालयाला केल्या. त्यानुसार चव्हाण यांना जोडमोहा येथे रुजू करुन न घेता पुन्हा जैसे थे आदेश ठेवत वाशिमला परत पाठविले गेले. चव्हाण यांच्या सोईसाठी वाशिमला बदलून आलेल्या वन अधिकाऱ्याची मात्र बरीच गैरसोय झाली. मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी आता चव्हाण यांची पुसदमधील कारकिर्द तपासून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या तमाम प्रकरणांचीही चौकशी लावावी, अशी मागणी वन वर्तुळातूनच पुढे आली आहे.

Web Title: Investigation of seven crore rupees in ACF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.